Mumbai Rain Updates Pudhari
मुंबई

Mumbai rain update: नवी मुंबई, पनवेल, उरण तालुक्याला बेसुमार पाऊस; महामार्ग ठप्प, एक्स्प्रेस वे बंद

जेएनपीए मार्गावर कंटेनर पलटी एकाचा मृत्यू; वाशीत बाल्कनीचा स्लॅब पडला एकाचा मृत्यू दोन जखमी; 24 तासात 91 झाडे उन्मळून पडली

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाला आहे. जेएनपीए मार्गावर कंटेनर उलटून एकजण जागीच ठार झाल्याची घटना घडली.उरण तालुक्यात अनेक ठिकाणी गावात पाणी घुसल्याने स्थानिकांकडून लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.वाशीत बाल्कनीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला असून दोन महिला जखमी आहेत.

नवी मुंबई शहरात सरासरी 178.67 मिमी पाऊस झाला असून जूनपासून 1198.88 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मोरबे धरण क्षेत्रात आज 332.40 मिमी इतका पाऊस झाला असून एकूण आतापर्यंत झालेला पाऊस 1203.80 मिमी पाऊस झाला आहे.धरणाची पातळीत वाढ होऊन 72.85 मीटर (42.48 %) टक्के एवढी झाली आहे. शहरात 91 झाडे उन्मळून पडली. दरड कोसळणे सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे.

पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये,असे आवाहन करण्यात येत आहे.अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा.पनवेल उरण परिसरामध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.पाण्याखाली आलेल्या घरात अडकलेल्या नागरिकांना होडीतून बाहेर काढण्याचे काम स्थानिक नागरिकांकडून केले जात आहे. प्रशासनाचा कोणताही अधिकारी या ठिकाणी नाही. त्यामुळे गावकरीच हे काम करतात. पावसाच्या जोरासोबत हवेचा जोर प्रचंड असल्याने भीतीदायक वातावरण आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास स्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे.

पनवेल मध्ये रात्रीपासून पावसाचा धुमाकुळ सुरु आहे.रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी भरले आहे.नवीन पनवेल मधील बांठिया शाळेजवळीस संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे.सेक्टर 18 भागात कंबरेवर पाणी साचले आहे. अनेक गाड्या अडकुन बंद पडल्या आहेत. पावसाचा जोर आणि हवेचा जोर यासह जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पनवेल मधील अनेक भागात पाणी भरल्याने प्रवाशांना मोठा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.उरण जेएनपीए मध्ये कंटेनर पडल्याने भीषण अपघात झाला आहे. हा कंटेनर तिथल्या कामगाराच्या अंगावर पडल्याने मोठी दुर्घटना घडली. पनवेल, उरण तालुक्यासह नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली.खाजगी, सार्वजनिक सर्वच शाळा बंद ठेवल्या आहेत.

24 तासात झालेला पाऊस

बेलापूर 188.40 मिमी

नेरुळ 165.60 मिमी

वाशी 154.40 मिमी

कोपरखैरणे 161.20 मिमी

ऐरोली 210.80 मिमी

दिघा 191.60 मिमी

सरासरी 178.67 मिमी

  • एकूण आतापर्यंत झालेला पाऊस 1198.88 मिमी

  • मोरबे धरण

आजचा पाऊस- 332.40 मिमी

एकूण आतापर्यंत झालेला पाऊस 1203.80 मिमी

धरणाची पातळी 72.85 मीटर (42.48 %) टक्के

  • घटना

आगीच्या घटना 2

झाडे पडणे 91

फांद्या पडणे- 4

स्लॅब (बाल्कनी) पडणे - 1

मृत्यू - 1

जखमी व्यक्ती - 1

लँड स्लाईड - 1

रेस्क्यू वर्दी - 1

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT