नवी मुंबई : नवी मुंबई भाजपामध्ये तिकीट वाटपावरून प्रचंड असंतोष उसळला आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्यांना आणि वादग्रस्त व्यक्तींना तिकीट दिल्याचा गंभीर आरोप तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष शिंदेसेना व राष्ट्रवादीमधून लढणाऱ्या उमेदवारांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. भाजपाचे पदाधिकारीच इतर पक्षांचा प्रचार करत असल्याचा आरोप करत नेतृत्त्व यावर कारवाई करणार का, असा थेट सवाल देखील नाराज उमेदवारांनी यावेळी उपस्थित केला.
भारतीय जनता पार्टीच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या समर्थकांना भाजपने तिकिट डावल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे युवा जिल्हा अध्यक्ष दत्ता घंगाळे शिवसेनेच्या तिकिटावर लढत आहेत. तर पांडूरंग आमले हे अपक्ष म्हणून निवडणुकींच्या रिंगणात उतरले ओह. मंगला घरत शिवसेना शिंदे गटातून, जयश्री चित्रे राष्ट्रवादी शरद पवार गटातून रिंगणात उतरल्या आहेत. या उमेदवारांनी भाजपवर संताप व्यक्त केला आहे.
आमदार मंदा म्हात्रे यांनाही फसवण्यात आल्याचा आरोप करत, विधानसभेच्या निवडणुकीत संदीप नाईक यांचे काम न केल्याचा राग आता तिकीट नाकारून काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाकडून 1000 सदस्य नोंदणी केल्यानंतरच उमेदवारीचा विचार केला जाईल, असे सांगितले जात असताना अनेक निष्क्रिय सदस्यांना थेट तिकीट देण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला.
माजी नगरसेवक मंगला घरत यांनी तर थेट माझा राजकीय खून झाला आहे, असा आरोप केला. जयश्री चित्रे यांनी आरोप केला की, सत्तेसाठी पक्ष बदलणारे लोक एजन्सी नेमून खोटे चित्र रंगवत आहेत. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर डल्ला मारला गेला आहे. भाजप म्हणजे काय हेच अनेक उमेदवारांना माहीत नाही. नवी मुंबईतून भाजप संपवण्याचाच विडा उचलला आहे का, असा संशय येतो. असाही आरोप त्यांनी केला.
आम्ही पक्षाचे मूळ आहोत, मात्र आम्हालाच गाफील ठेवले गेले. जिल्हाध्यक्षांनंतरचे महत्त्वाचे पद असतानाही आमच्याशी कुठलीही चर्चा झाली नाही. आम्हाला खड्यांप्रमाणे बाजूला सारले गेले, अशी तीव्र भावना दत्ता घागाळे यांनी व्यक्त केली.