मुंबई

Narhari Zirwal | "मुख्यमंत्र्यांच्या मनात माझ्या कामाबद्दल...." : लाचखोरी प्रकरणी मंत्री झिरवळांनी स्पष्टच सांगितले

लाचप्रकरणी सखोल चौकशीचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

Narhari Zirwal on bribery case

मुंबई : "माझं कोणासोबत वैर नाही. माझा कोणीही स्पर्धक नाही. माझ्या बाबतीत मला विश्वास आहे की, मुद्दाम कोणीही अडकवणार नाही. कोणाचे अधिकार काढायचे आणि दुसऱ्याकडे द्यायचे हे मुख्यमंत्र्यांच्या हाती असतं. मुख्यमंत्री यांच्या मनात माझ्या कामाबद्दल किंतु नाही. लाचखोरीचा प्रकार खपवून घेण्यासारखा नाही. या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

राजेंद्र ढेरिंगे याची चौकशी सुरू

नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील विभागाचा कारकून राजेंद्र ढेरिंगे यांना लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रंगेहात पकडले होते. याप्रकरणी माध्यमांशी बोलताना झिरवळ म्हणाले की, १२ फेब्रुवारीला मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागात घडलेला प्रकार सर्वांना माहिती आहे. मला या प्रकरणाची कोणतीही माहिती नाही. ऑफिस आणि कार्यालय जवळ आहे, पण तिथे जाऊन कधी पाहणी करण्याची वेळ आली नाही. राजेंद्र ढेरिंगे याची चौकशी सुरू आहे. एक स्वतंत्र चौकशी नेमून, पोलीस उपायुक्त यांच्या मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कारवाई आहे ती त्या ठिकाणी केली जाईल.

मी चुकीचं करणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे

मंत्रालयात घडलेल्या प्रकाराबाबत सुप्रियाताई बोलल्या आहेत. आम्ही एकत्र पक्षात काम केलं आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी असेल तर आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं आहे. मी चुकीचं करणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाही. डाग लागतो तेव्हा आत्मा दुखतो, अशी खंत व्यक्त करत सत्य हे सत्य असतं. हे असे प्रकार मंत्रालयात होत असतील तर डोळ्यात तेल घालून कामकाज करावं लागणार आहे. कोणाचाही संबंध असेल तर त्यालाही भोगावं लागेल. कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी विलीनीकरणावर आता बोलणे योग्य नाही

दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार का याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील. आता त्यावर बोलणं योग्य नाही. सोमवारी झालेली बैठकही दादा असताना व्हायची तशी झाली. आपण कसं पुढे जायचं असा विश्वास देण्यासाठी ही बैठक होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीवेळी अल्पसंख्यांक शाळासंदर्भात चर्चा नाही. सुनेत्रा वहिनी यांनीही त्यावर माहिती घेतली आहे, असेही झिरवळ म्हणाले.

माणूस मरतो... जाताना काहीतरी चांगलं लिहिलं पाहिजे

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे नेहमीच टीका करत असतात. माणूस मरतो; पण जाताना काहीतरी चांगलं लिहिलं पाहिजे. आज आमचा नेता गेला आहे. अजितदादांना पाहिलं नाही, ते देखील रडत होते. अशा माणसावर शिंतोडे उडवले जातात. सामना मधून टीका करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT