

नाशिक : विधानसभा निवडणुकांवेळी महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वानस सरकारने दिले होते. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याची लाडक्या बहिणांना प्रतीक्षा असतानाच राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी 'लाडक्या बहिणीं'ना 2100 रुपये देऊ, असे कुणीच म्हटले नाही', असे सांगत घूमजाव केला आहे.
लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्यातील हफ्ता कधी जमा होणार, याची प्रतीक्षा सध्या लाडक्या बहिणींना आहे. तसेच, 1500 रुपयांचे 2100 कधी होणार याचीदेखील उत्सुकता आहे. मात्र, लाडक्या बहिणींच्या हप्त्यावरून सत्ताधाऱ्यांची टोलवाटोलवी सुरूच असल्याचे बघावयास मिळत आहे. 2100 रुपये देण्याबाबत आर्थिक बजेट पाहून निर्णय घेऊ, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. महायुती सरकार पुन्हा सत्तेत येऊनदेखील लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये पुन्हा वाढ न करण्यात आल्यानं विरोधकांकडून सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. त्यावर जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो, असे उत्तर सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आले आहे. अनेक मंत्र्यांनीही यावर उलटसुलट विधाने केली आहेत. असे असतानाच 'लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही', असे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री झिरवाळ यांनी सांगितले आहे. विरोधकांनीच 2100 रुपयांवर जोर लावला आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपयेही पुरेसे आहेत, त्या खूश आहेत, असे म्हणत मंत्री झिरवाळ यांनी 2100 रुपये देण्यावरून थेट पलटी मारल्याचे दिसत आहे.