Narhari Zirwal: मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कारकुनाला लाच घेताना अटक, मंत्रालयातच सापळा

Minister staff bribery Case: मंत्रालयातच सापळा : कारकून राजेंद्र ढेरंगेने घेतले मंत्र्यांच्या पीएसचे नाव, कारवाईबद्दल गुप्तता
Narhari Zirwal Clerk Bribe Case.
Narhari Zirwal Clerk Bribe Case.Pudhari
Published on
Updated on

Narhari Zirwal Clerk Bribe case

मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील विभागाचा कारकून राजेंद्र ढेरंगे यांना लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रंगेहाथ अटक केली. झिरवळ यांचे खासगी सचिव (पीएस) रामदास गाडे यांच्याच सांगण्यावरून पैसे मागितले, असा जवाब ढेरंगे याने दिल्याचे समजते.

नरहरी झिरवळ यांच्याकडे विद्यमान सरकारमध्ये अन्न व औषध प्रशासनची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून केमिस्ट परवाने प्रकरणात लाच घेतली जात असल्याचे सांगितले जात होते. ती तक्रार अखेर खरी ठरली. मंत्री नरहरी झिरवळ यांचा कारकून राजेंद्र ढेरंगे लाच घेऊन कामे करतो, अशी मूळ तक्रार होती. हात ओले केल्याशिवाय त्याच्याकडे काम होत नाही, असे तक्रारदाराचे म्हणणे होते.

वैद्यकीय परवाना देण्यासाठी राजेंद्र ढेरंगे याने 50 हजार रुपयांची मागणी केली आणि 35 हजार रुपयांवर मांडवली झाली, या पक्षकाराच्या तक्रारीनुसार मंत्री नरहरी झिरवळ यांच्याच कार्यालयात राजेंद्र ढेरंगे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचला. मंत्री झिरवळ यांचा पीएस रामदास गाडे याच्या सांगण्यानुसारच आपण लाच घेत होतो, असे राजेंद्र ढेरंगे याने कबूल केले, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

मंत्रालयाच्या दुसर्‍या मजल्यावर अन्न व औषधी प्रशासन विभाग आहे. याच विभागात गुरुवारी सायंकाळी अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोचे म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहा अधिकारी पोहोचले. त्यांनी सापळा रचला आणि मंत्री झिरवळ यांचा कारकून राजेंद्र ढेरंगे यास अटक केली. गुरुवारी सायंकाळी 6 वाजून 6 मिनिटांनी झालेल्या या कारवाईची कुजबूज वाढली.

मंत्रालयातील भ्रष्टाचार दूर व्हावा यासाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू असताना त्या प्रयत्नांना यश तर आले नाहीच; उलट मंत्री कार्यालयच लाच घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रदेश काँग्रेसने सोशल मीडियावर या कारवाईचा बभ्रा केला. मात्र, रात्र उलटली तरी लाचलूचपत प्रतिबंधक खात्याने कोणतेही प्रसिद्धीपत्रक जारी केलेले नव्हते.

रामदास गाडे दिल्लीत

झिरवाळ यांच्या खात्याचा कारकून राजू तथा राजेंद्र ढेरंगे याच्या पाठोपाठ मंत्र्यांचे पीएस रामदास गाडे यांनाही अटक झाल्याचे वृत्त होते. मात्र पुढारी प्रतिनिधीने थेट गाडे यांनाच संपर्क साधला असता ते दिल्लीत होते. मंत्री झिरवाळ यांच्यासोबत आपण दिल्लीत असून, झालेल्या कारवाईचा आणि आपला संबंध कसा असू शकेल, असा सवाल त्यांनी केला. मात्र, मंत्रालयात झालेल्या कारवाईची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचलेली होती आणि तेदेखील अधिक माहिती घेत होते.

दरम्यान, महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जनतेची कामे पैशाशिवाय होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news