Narhari zirwal clerk bribery case | मंत्री झिरवळ अंधारात अन् ‘एसीबी’ मंत्रालयात; लाचखोर कारकुनाला 3 दिवसांची पोलिस कोठडी

Narhari zirwal clerk bribery case |
Narhari zirwal clerk bribery case | मंत्री झिरवळ अंधारात अन् ‘एसीबी’ मंत्रालयात; लाचखोर कारकुनाला 3 दिवसांची पोलिस कोठडी
Published on
Updated on

मुंबई : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील दुसर्‍या मजल्यावरील कार्यालयात घुसून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने धाडसी कारवाई करत झिरवळ यांचा कारकून राजेंद्र ढेरिंगे याला लाच घेताना अटक केल्याने एकाच वेळी मंत्री झिरवळ, त्यांच्या विभागाचा कारभार आणि मंत्रालयासारख्या सर्वोच्च यंत्रणेची इभ्रत चर्चेला आली आहे. मंत्री झिरवळ यांनी मात्र या लाच प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही, असे दिल्ली मुक्कामी निक्षून सांगितले आहे. मात्र, आरोपी कारकून राजेंद्र ढेरिंगेला शुक्रवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याच्या चौकशीत काय समोर येते याकडेही सर्वांचे लक्ष असेल.

राज्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या मंत्रालय कार्यालयातील लाचखोर लिपिक राजू संपत ढेरिंगे याला शुक्रवारी विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 16 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू असून या चौकशीतून त्याच्या आणखी काही सहकार्‍यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सूत्रे कुणी हलवली?

गृह विभागाच्या परवानगीनंतरच एसीबीच्या अधिकार्‍यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कारकून राजेंद्र ढेरिंगे याच्यावर झडप घातली. मंत्रालयातील मंत्री कार्यालय किंवा अन्य कार्यालयात कारवाई करायची असेल तर गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर यांची परवानगी घ्यावी लागते. त्यांनीच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला झिरवळ यांच्या मंत्री कार्यालयावर कारवाई करण्याची परवानगी दिली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केलेल्या कारवाईबाबत मंत्री झिरवळ यांना कोणतीही कल्पना म्हैसकरांच्या कार्यालयातून दिली गेली नाही. परवानगी मिळताच एसीबीच्या अधिकार्‍यांनी सोमवारपासून ढेरिंगेवर पाळत ठेवली होती. ढेरिंगे लाच मागत असल्याचे निश्चित होताच गुरुवारी सापळा रचण्यात आला.

मंत्रालयात एसीबीचे पथक झिरवळांच्या कार्यालयात धडकले तेव्हा मंत्री झिरवळ दिल्लीत होते आणि त्यांना या कारवाईची भनकदेखील एसीबीने किंवा म्हैसकरांच्या कार्यालयाने लागू दिली नाही. त्यामुळे या कारवाईचे सूत्रधार कोण, असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. एसीबीचा सापळा यशस्वी व्हावा म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचे सांगितले जाते. कारण एसीबीने अटक करताच लाचखोर कारकून राजू संपत ढेरिंगे याने मंत्री झिरवळ यांचे खासगी सचिव रामदास घाडे यांच्या सांगण्यावरून पैसे मागितले, असा जबाब प्राथमिक चौकशीत एसीबीला दिला आहे. मनीषा म्हैसकर यांनी या धाडीला परवानगी दिली असली तरी त्यासाठी राजकीय स्तरावर या कारवाईची सूत्रे कुणी हलवली, याचा अंदाज बांधणे सुरू आहे.

काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लाचखोरीची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मंत्री नरहरी झिरवळ यांनी तत्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. सपकाळ म्हणाले की, महाभ्रष्ट भाजप महायुतीने मंत्रालयाचे भ्रष्टाचारालय केले आहे. झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिकाने वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे, हे आणखी धक्कादायक आणि गंभीर आहे. त्यामुळे मंत्री झिरवळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. संबंध आढळल्यास राजीनामा देईन, अशी भूमिका मंत्री नरहरी झिरवळ यांनी मांडली आहे. मात्र नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरू असल्याचे समोर आल्यावर निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तत्काळ मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.

लाच घेण्याशी संबंध आढळल्यास मी राजीनामा देईन : झिरवळ

माझ्या कार्यालयातील व्यक्तीने लाच घेतल्याचा संबंध माझ्याशी असल्याचे सिद्ध झाल्यास मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, अशी भूमिका मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिल्लीत मांडली. मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात एसीबीची धाड पडली आणि त्यांचा कारकून राजेंद्र ढेरिंगे 35 हजारांची लाच घेताना पकडला गेला. ही बातमी झिरवळ यांना दिल्ली मुक्कामातच समजली. शुक्रवारी त्यासंदर्भात मांध्यमांशी बोलताना मंत्री झिरवळ म्हणाले, झालेला प्रकार निंदनीय आहे. संबंधित व्यक्तीला कुठेही पाठीशी घालणार नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आपली कारवाई योग्य पद्धतीने करेल. चौकशी निष्पक्ष झालीच पाहिजे या मताचा मी आहे. कारवाई पूर्ण होईपर्यंत यात कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण बोलणार आहोत. राजीनामा मागणे हे विरोधी पक्षाचे काम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news