Mumbai Pune Expressway Traffic Pudhari
मुंबई

Mumbai Pune Expressway Traffic: पुणे–मुंबई एक्स्प्रेसवे पुन्हा ठप्प! बोरघाटात वाहने बंद पडल्याने मोठी कोंडी; गाड्यांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Pune Expressway Traffic: टँकर अपघातानंतर मार्ग मोकळा झालेला असतानाच बोरघाटात वाहने बंद पडल्याने पुणे–मुंबई एक्स्प्रेसवेवर पुन्हा कोंडी झाली. या प्रकाराची दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

Rahul Shelke

Mumbai Pune Expressway Traffic Updates: मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक अजूनही पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. टँकरच्या अपघातानंतर तब्बल 32 तास प्रवासी अडकून पडल्याची घटना ताजी असतानाच, आता बोरघाट परिसरात अनेक वाहने बंद पडल्यामुळे पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. घाटातील अडकलेली वाहने हटवली जात नाहीत, तोपर्यंत मार्ग मोकळा होणं कठीण असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

अपघातग्रस्त टँकर हटवल्यानंतर काही काळ वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र त्यानंतर अवघ्या 24 तासांतच नव्या अडथळ्यांमुळे पुन्हा वाहनांच्या रांगा लागल्या. विशेषतः जड वाहनं घाटात अडकल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक संथ झाली असून प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.

Mumbai Pune Expressway Traffic

या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, तसेच आपत्कालीन परिस्थितीत अधिक प्रभावी व्यवस्थापन कसं करता येईल, याबाबत सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या वाहतूक कोंडीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी तातडीने आपत्कालीन वाहतूक आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या असून, द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’चं काम वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यास सांगितलं आहे.

सध्या प्रशासनाकडून घाटातील बंद पडलेली वाहने हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तोपर्यंत प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रवास करताना अतिरिक्त वेळ हाताशी ठेवावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT