Mumbai-Pune Expressway | ‘गॅस’वरचा एक्स्प्रेस वे!

Mumbai-Pune Expressway closed for 31 hours
Mumbai-Pune Expressway | ‘गॅस’वरचा एक्स्प्रेस वे!(Pudhari File Photo)
Published on
Updated on

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तब्बल 31 तास ठप्प राहतो ही अंगावर अक्षरशः काटा येण्यासारखीच गोष्ट. ही नुसतीच वाहतूक कोंडी नव्हती, तर हजारो प्रवाशांंचा जीव अक्षरशः ‘गॅस’वर ठेवणारी स्थिती होती. प्रोपेलिन हा अत्यंत ज्वलनशील वायू घेऊन जाणारा टँकर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान उलटला आणि त्यातून वायू गळती सुरू झाली. त्यानंतर या सहा पदरी मार्गावरील वाहतूक थांबवली गेली. ‘मेगा हायवे’म्हणून ओळखला जात असलेल्या या मार्गावरील कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचे मेगा हाल झाले. या मार्गावरून दररोज सुमारे 75 हजार वाहने धावतात. यातील 25 हजारांच्या आसपास वाहने जागच्या जागी थबकली. ट्रक, टँकर, एस.टी. बसेस, कार, अ‍ॅम्ब्युलन्स, टेम्पो अशी सर्वच वाहने कोंडीत अडकली आणि 25 किलोमीटरचा प्रचंड दाटीवाटीचा ‘वाहनतळ’ तयार झाला.

आपत्ती व्यवस्थापन नावाची अनेक थर असलेली व्यवस्था ही कोंडी फोडण्यात निष्प्रभ ठरली. कारण, इतक्या तासांच्या कोंडीचा हा पहिलाच प्रसंग. त्याचा अनुभव या व्यवस्थेला नव्हता. आबालवृद्धांपासून सर्वजण हतबलपणे अडकून पडले. वाट पाहण्यावाचून त्यांच्या हातात काहीही उरले नव्हते. कुणी उपचारांसाठी मुंबईला येत होते, कुणी विमान पकडण्यासाठी निघाले होते, कुणी मुलाखती देण्यासाठी जात होते. त्यांच्या वेळेचे तीन-तेरा झाले. मुंबईला जोडणार्‍या महामार्गांपैकी हा सर्वात महत्त्वाचा मार्ग. भरमसाट टोल देऊनही याच कोंडीच्या मार्गाने प्रवाशांना प्रवास करावा लागतो. सार्‍या दक्षिण भारताला, कोकण, पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा महामार्ग. तशा अर्थाने ही महाराष्ट्राची लाईफलाईन. सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेल्या या महामार्गाला कालांतराने वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले.

ताजी वाहतूक कोंडी प्रवाशांना धडकी भरवणारी त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या मर्यादा उघड करणारी ठरली. ज्वलनशील वायूंचे शेकडो टँकर या मार्गावरून दररोज धावत असतात. मात्र, ते दुर्घटनाग्रस्त झाले तर परिस्थिती कशी हाताळायची याची व्यवस्था या महामार्गावर उभारली गेलेली नाही. ती असती तर महामार्ग ठप्प झाला नसता. अपघातसमयी मदत करा, वाटेत थांबू नका, असे केवळ फलक लावल्याने प्रवास सुरळीत होत नाही. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवून वाहतूक सुरळीत ठेवणे हे खरे कौशल्य. या कसोटीला महामार्ग वाहतूक नियंत्रण शाखा सपशेल फेल ठरली. या मार्गावरील टोल नाके सोडल्यास काही अपवाद वगळता कुठेही प्रसाधनगृहांची सोय नसल्याने 31 तासांच्या वाहतूक कोंडीत महिलांचे प्रचंड हाल झाले. प्रवाशांकडील पाणी-खाद्यपदार्थ संपल्याने काही सामाजिक संस्थांच्या मदतीने पोलिसांनी बिस्कीट आणि पाण्याच्या बाटल्या पुरवल्या; पण त्यांना प्रत्येकापर्यंत पोहोचता आले नाही. प्रगत देशांमध्ये अशा महामार्गांवर सर्व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध असतात. त्यात अपघातग्रस्त वाहने दूर करण्यापासून ते जखमींवर त्याच ठिकाणी सुसज्ज अ‍ॅम्ब्युलन्समध्ये उपचार केले जातात.

गंभीर आजारी अथवा जखमींना एअरलिफ्ट करून जवळच्या सुसज्ज रुग्णालयामध्ये नेले जाते. आपल्याकडे तशी स्थिती नाही. या मार्गावर एकाच ठिकाणी ओझर्डे येथे ट्रॉमा केअर युनिट आणि दोन हेलिपॅडची व्यवस्था आहे. 94.5 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर नाही म्हणायला तत्काळ प्रतिसाद पथके तैनात असतात. ती कोणत्याही ठिकाणी 12 मिनिटांत पोहोचतील अशी व्यवस्था आहे; मात्र त्यांचा उपयोग किरकोळ अपघात प्रसंगीच होतो. वायुगळतीसारख्या प्रसंगात परिस्थिती हाताळणारी यंत्रणा येथे उपलब्ध नाही. त्यामुळेच ही वायू गळती थांबवण्यास तब्बल 22 तास लागले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची चौकशी करून संबंधित विभागाला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे; तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-पुणे मिसिंग लिंक तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मिसिंग लिंकमुळे या मार्गावरील अंतर साडेपाच किलोमीटरने कमी होईल, तसेच वाहतूक कोंडी झाल्यास हा मार्ग उपयोगी पडेल. मात्र, वायुगळतीसारखे प्रकार घडल्यास ते तत्काळ नियंत्रणात कसे आणता येतील, यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. या वायू गळतीमध्ये कुठेही आग लागली नाही, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या घटनेतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे प्रशासनाच्या विविध यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव. सायंकाळी पाचला टँकर दुर्घटनाग्रस्त झाल्यावर अवघ्या दहा मिनिटात सर्व संबंधित यंत्रणांना सजग करून वाहनांना या कोंडीत अडकू न देण्याची खबरदारी घ्यायला हवी होती.

वाहतूक कोंडीची माहिती टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांना असते; मात्र असे असूनही टोल घेऊन वाहने पुढे सोडण्यात येत होती. परिणामी, 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. मुंबईतून पुण्याला किंवा पुण्यातून मुंबईला जाण्यासाठी काही पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. ते लांबचे असले तरी अशा प्रसंगी परवडू शकतात. प्रवास काही तासांनी वाढतो इतकेच. हे मार्ग अवलंबले असते तर 31 तास कोंडीत अडकून राहण्याची वेळ प्रवाशांवर आली नसती. याबाबत किमान यापुढे तरी प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज आहे. मुंबई, पुण्यात मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. त्यांना सतत कोणत्या ना कोणत्या वायू पुरवठ्यांची गरज भासते. त्यामुळे या महामार्गावरून अशी वायू वाहतूक सतत असणार आहे. पुढे असा आणखी एखादा टँकर या मार्गावर उलटला, काही दुर्घटना घडली तर त्यावेळी उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती अत्यंत कौशल्याने हाताळणारी व्यवस्था मुंबई आणि पुणे या दोन्ही बाजूने उभारणे गरजेचे आहे. सध्या नवी मुंबईचा विमानतळ सुरू झाला आहे. तो भविष्यात पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीचा ताण आणखी वाढेल. हा मार्ग 10 पदरी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे वाहतूक वेगवान होईल; पण धोकेही वाढतील. ते लक्षात घेऊन हा मार्ग सुरक्षित करावा लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news