
महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2026) बहुप्रतिक्षित अंतिम सामन्याचा बिगुल वाजला आहे. वडोदरा येथील मैदानावर रंगलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाची कर्णधार स्मृती मंधानाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दिल्ली कॅपिटल्सला आता प्रथम फलंदाजी करत आव्हानात्मक धावसंख्या उभारावी लागणार आहे.
वडोदरा येथील आकडेवारी पाहता, ज्या संघाने टॉस जिंकला आहे, त्यांनी १६ पैकी १२ सामन्यांत विजय मिळवला आहे. हीच परंपरा कायम राखत स्मृतीने प्रथम गोलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. स्मृती म्हणाली, "या खेळपट्टीवर पाठलाग करणे सोपे जाते, त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षणाला पसंती दिली." दुसरीकडे, दिल्लीची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्ज म्हणाली की, "अशा मोठ्या सामन्यात टॉस हारणे कधीकधी फायद्याचे ठरते. आम्ही एलिमिनेटरमध्ये याच खेळपट्टीवर खेळलो आहोत, त्यामुळे आम्हाला येथील परिस्थितीचा अंदाज आहे."
अंतिम सामन्याचे दडपण लक्षात घेता, दोन्ही कर्णधारांनी आपल्या विजयी संयोजनात कोणताही बदल केलेला नाही. दोन्ही संघ मागील सामन्यातील प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरले आहेत.