मुंबई : आरे ते कफ परेड असा विस्तार झाल्यानंतर मेट्रो 3 भुयारी मार्गिकेच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. सप्टेंबर 2025 मध्ये 19.70 लाख भुयारी मेट्रोने प्रवास करत होते. 3 महिन्यांत दुपटीने वाढून ही संख्या 46.56 लाखांवर गेली आहे.
आरे ते बीकेसी मेट्रो 3 भुयारी मार्गिकेचा ऑक्टोबर 2025 पासून कफ परेडपर्यंत विस्तार करण्यात आला. गेल्या वर्षी विस्तारीकरणापूर्वी सप्टेंबरमध्ये आरे ते वरळी या मार्गिकेवर 19 लाख 70 हजार प्रवाशांनी प्रवास केला. 9 ऑक्टोबरला पूर्ण मार्गिका कार्यान्वित झाली. पूर्ण ऑक्टोबर महिन्यात 38.63 लाख प्रवाशांनी प्रवास केला. नोव्हेंबरमध्ये ही संख्या 44.58 लाखांवर पोहोचली. वर्षअखेर डिसेंबरमध्ये 46.56 लाख प्रवाशांनी भुयारी मेट्रो मार्गिकेवरून प्रवास केला.
विस्तारीकरणापूर्वी भुयारी मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या सरासरी 75 हजार 52 इतकी होती. यातही विस्तारीकरणानंतर वाढ दिसून आली. आरे ते कफ परेड पूर्ण मार्गिकेवर दैनंदिन प्रवाशांची संख्या ऑक्टोबरमध्ये 1.23 लाख, नोव्हेंबरमध्ये 1.32 लाख आणि डिसेंबरमध्ये 1.48 लाखांवर पोहोचली. 16 ऑक्टोबर 2025 रोजी 1.82 लाख प्रवाशांनी प्रवास केला. ही विस्तारीकरणानंतरची सर्वोच्च संख्या आहे.
वाढत्या प्रवासी संख्येची गरज भागवण्यासाठी 5 जानेवारीपासून फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये
रोज 27 वाढीव फेऱ्यांसह एकूण
292 फेऱ्या चालवल्या जात आहेत. शनिवारी 209 फेऱ्यांऐवजी आता
236 फेऱ्या चालवल्या जात
आहेत. रविवारी पूर्वीप्रमाणेच 198 फेऱ्या चालवल्या जात आहेत.