Mumbai Mazgaon Ganpati Row Video Pudhari
मुंबई

Mumbai Mazgaon Ganpati: माझगावात गणपती मिरवणुकीदरम्यान काय वाद झाला?

Mumbai Mazgaon Ganpati Row: मुंबईतील माझगाव येथे ‘माझगावचा मोरया’ गणपतीच्या आगमन मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप झाल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Mazgaon Ganpati Row: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील माझगाव परिसरात रविवारी रात्री तणाव निर्माण झाला. ‘माझगावचा मोरया’ गणपतीच्या आगमन मिरवणुकीवर जवळच्या एका इमारतीतून अंडी फेकल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर गणेशभक्त मोठ्या संख्येने परिसरात जमा झाले. काही काळ वातावरण तणावपूर्ण होते, मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

मिळालेल्या माहितीनुसार, गणपतीची आगमन मिरवणूक मंडपापासून सुमारे 30 ते 40 मीटर अंतरावरून जात असताना ही घटना घडल्याचा आरोप आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जवळच्या एका इमारतीतून मिरवणुकीच्या दिशेने अंडे फेकण्यात आले. हे अंडे गणपतीच्या मूर्ती असलेल्या ट्रॉलीजवळ फुटल्याचेही सांगण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी जयंत मीणा घटनास्थळी पोहोचले. वाढता जमाव पाहता त्यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देऊन किंवा गोंधळ घालून परिस्थिती बिघडवू नका, पोलिसांवर विश्वास ठेवा आणि कायद्याला त्याचे काम करू द्या, असे आवाहन त्यांनी केले.

पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिसरात बंदोबस्त वाढवला. नागरिकांना अफवा किंवा भडकावू माहितीवर विश्वास न ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले.

अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल

मुंबई पोलीस आयुक्तांच्या निर्देशानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. ही घटना नेमकी कोणी घडवून आणली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू असून, त्याच्या आधारे संशयित व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोषी व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

गणेशभक्तांना शांततेचे आवाहन

या घटनेनंतर विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही परिसरात पोहोचले. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती. मात्र, सर्वांनी शांतता राखावी आणि पोलिसांच्या तपासात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, आरोपीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

भुलेश्वरमधील दुर्घटनेनंतर पुन्हा चिंता

माझगावमधील ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा मुंबईत गणेश मूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान नुकतीच एक मोठी दुर्घटना घडली होती. भुलेश्वर येथे मोठी गणेशमूर्ती कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला होता, तर पाच जण जखमी झाले होते, अशी माहिती समोर आली होती.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणात मिरवणुका आणि सार्वजनिक उत्सवांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT