

मुंबई: गणेशमूर्ती पूर्णपणे सुकलेली नसताना तसेच वेल्डिंगचे काम शिल्लक असताना अखिल भुलेश्वर सार्वजनिक मंडळाने ही मूर्ती मंडपात आणण्याची घाई केल्यामुळे दुर्घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे.
आगमनावेळी भुलेश्वरच्या राजाची मूर्ती शनिवारी रात्री कोसळल्याने संकेत नेवशे, ब्रिजेश जोशी या दोन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेत जखमी झालेल्या सहा जणांवर जी. टी.,जे. जे. या रुग्णालयांत प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
थायलंडमधील एका प्रसिद्ध मंदिरात असलेल्या गणपतीच्या मूर्ती प्रमाणेच ही मूर्ती घडवण्यात आली होती. भायखळा येथे कारखाना असलेल्या अनिकेत देसाई या तरुण मूर्तिकाराने ही मूर्ती घडवली होती. मूर्तीची उंची साधारण २८ फूट, तर वजन दोन टनाच्या आसपास होते.
मूर्ती पूर्णपणे सुकली नसल्यामुळे तसेच ती थोडी ओलसर असल्यामुळे दहा दिवसांनी मूर्ती घेऊन जा, असे मूर्तिकाराने भुलेश्वर येथील मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितले होते. परंतु इंदोरवरून सामान घेऊन येणारा डेकोरेटर २९ तारखेला मुंबईत दाखल होणार असल्याने भुलेश्वरच्या मंडळातील कार्यकर्त्यांनी आगमनाची घाई केली होती.
आगमनाच्या वेळी मूर्तिशाळेतून मूर्ती बाहेर पडताना गणपतीच्या गळ्यातील हार निसटला होता. त्यानंतर काही वेळाने पाठीमागची वेल्डिंगदेखील सुटली होती. त्यामुळे पुन्हा गणपती मंडपात नेऊन वेल्डिंग पूर्ववत करण्यात आले होते. भायखळा येथून आगमनासाठी गणपती मार्गस्थ होऊन भुलेश्वर मध्ये दाखल झाल्यावर पुन्हा एकदा गणपतीच्या गळ्यातील हार निसटून खाली आला होता.
त्याच दरम्यान पुन्हा वेल्डिंग निसटल्याने गणपतीची मूर्ती कोसळल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यावेळी संकेत नेवसे आणि ब्रिजेश जोशी यांनी गणपतीला सावरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दोन टनाची मूर्ती या दोघांसह इतर कार्यकर्त्यांच्या अंगावर पडल्यामुळे अनर्थ घडला.
प्लास्टरच्या ढिगार्याखाली सर्वजण अडकून पडले होते. संकेतच्या मानेपासून खालचा भाग संपूर्ण प्लास्टरखाली आला होता. त्याचवेळी त्याच्या कानातून रक्त येताना लोकांनी पाहिले होते. परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याचबरोबर त्याच्या बाजूला असलेला ब्रिजेश जोशी हा देखील मरण पावला.
रविवाी दुपारी दीड दोन च्या सुमारास गिरगावातल्या चंदनवाडी स्मशानभूमी येथे संकेत आणि ब्रिजेश दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिथे प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेमुळे गिरगाव खेतवाडी कुंभारवाडा परिसरातील अनेक मंडळांनी गणपतीचे आगमन व मिरवणुका रद्द केल्या होत्या.
संकेतचे वडील पूर्वी भुलेश्वरच्या राजा या मंडळाचे अध्यक्ष होते त्यांच्या निधनानंतर गेल्या १८ वर्षापासून संकेत मंडळाचे कामकाज पहात होता. काही वर्षांपासून तो मंडळाचा अध्यक्ष होता. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचा कुलाबा विधानसभा उपविभाग प्रमुख म्हणूनही तो काम पाहत होता.
मूर्ती दुर्घटनेप्रकरणी एल. टी मार्ग पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. सोशल मिडीयावर व्हायरल झालेले व्हिडीओ पोलिसांकडून तपासले जात आहेत. जखमीसह इतरांची चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली आहे. चौकशीनंतर पुढील कारवाईची दिशा ठरविली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान या घटनेने परिसरात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या घटनेची पोलीस उपायुक्त आर रागसुधा यांनी गंभीर दखल घेत एल. टी मार्ग पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्तांनीही पोलिसांना तपास पूर्ण करुन तातडीने त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश एल. टी मार्ग पोलिसांना दिले आहेत.
सामाजिक बांधिलकी, हेच कर्तव्य!
भुलेश्वर येथे घडलेल्या शनिवारी दुर्दैवी अपघाताची घटना घडल्यानंतर या कठीण प्रसंगी भुलेश्वरचा राजा मंडळासोबत लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली (मुंबईचा राजा) एका कुटुंबासारखे खंबीरपणे उभे राहीले आहे. याच बंधुभावातून आणि एक कर्तव्य म्हणून 'मुंबईचा राजा'तर्फे 'भुलेश्वरचा राजा' मंडळाकडे तीन लाखांचा निधी सुपूर्द करण्यात आला आहे.