प्रतीकात्मक छायाचित्र. File Photo.
मुंबई

Mumbai plastic pollution|प्लास्टिकचा 'फास'..! मुंबईच्या समुद्रात दरवर्षी फेकला जातोय तब्‍बल ५० लाख किलो प्लास्टिक कचरा!

Mumbai plastic pollution | 'द ओशन क्लीनअप'च्‍या अभ्‍यासात धक्‍कादायक वास्‍तवावर प्रकाशझोत

पुढारी वृत्तसेवा

  • जगातील सर्वाधिक प्‍लास्‍टिक प्रदूषण करणार्‍या शहरांमध्‍ये मुंबईचा समावेश

  • ठाणे , मालाडआणि वसई खाडी प्लास्टिक प्रदूषणाचे मोठे कारण

  • १०७ दुर्मिळ जीवजंतूंसह १९ लाखांच्‍या रोजगारावरही नकारात्‍मक परिणाम

Mumbai plastic pollution

मुंबई : महानगरातील सुमारे ५० नाल्यांमधून दरवर्षी जवळपास ५० लाख किलो प्लास्टिक कचरा अरबी समुद्रात वाहून जात आहे, अशी पर्यावरणाची भयावहता स्‍पष्‍ट करणारी माहिती नेदरलँडमधील 'द ओशन क्लीनअप' (टीओसी ) या समुद्र आणि नद्यांमधील प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी काम करणाऱ्या संस्थेच्‍या अभ्‍यासात समोर आली आहे.

ठाणे , मालाडआणि वसई खाडी प्लास्टिक प्रदूषणाचे मोठे कारण

'द ओशन क्लीनअप' या संस्‍थेने २०२४ ते २०२५ मे असा एक वर्षाच्‍या कालावधीत नद्या आणि उपनद्यांमधून प्लास्टिकच्या प्रवाहाचे मॅपिंग केले. अखेर समुद्रात जाण्यापूर्वी शहरातील पाण्याच्या वाहिन्यांमध्ये वाहून जातात. मुंबई महानगर प्रदेशात प्लास्टिक प्रदूषणाचे तीन सर्वात मोठे कारण म्हणून ठाणे , मालाडआणि वसई खाडी असल्‍याचे अभ्‍यासात स्‍पष्‍ट झाले आहे.

१०७ दुर्मिळ जीवजंतूंसह १९ लाखांच्‍या रोजगारावरही नकारात्‍मक परिणाम

या अभ्‍यासाबाबत माहिती देताना 'टीओसी' संस्थेचे संस्थापक बोयन स्लॅट यांनी सांगितले की, मुंबईतील नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा वाहून येतो. हा कचरा केवळ समुद्रातच जात नाही, तर तो आपल्या किनाऱ्यांवर आणि खारफुटीच्या जंगलांमध्येही अडकतो. याचा परिणाम मुंबईच्या २२० किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर आणि १५२ चौरस किलोमीटरच्या खारफुटी क्षेत्रावर होत आहे. यामुळे १०७ दुर्मिळ जीवजंतूंच्या प्रजातींना धोका निर्माण झाला असून, समुद्र आणि किनाऱ्यांवर अवलंबून असलेल्या सुमारे १९ लाख लोकांच्या रोजगारावरही याचा वाईट परिणाम होत आहे.

उपाययोजना कोणती करण्‍यात येणार?

'टीओसी' संस्थेने या अभ्यासाच्या आधारे आता एक विशेष योजना आखली आहे. नाल्यांचे पाणी खाडीला किंवा समुद्राला मिळते त्‍या ठिकणी कचरा अडवणारी खास यंत्रे बसवण्यात येणार आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही यंत्रे ट्रॉम्बे आणि मालाड येथे बसवण्याचा संस्थेचा विचार आहे. सुरुवातीच्या काळात या यंत्रांच्या मदतीने सुमारे ६१ ते ९२ टन प्लास्टिक गोळा करणे शक्य होईल, असा अंदाज आहे.

उपाययोजनेत आव्‍हाने कोणती?

'द ओशन क्लीनअप' संस्था पुढील तीन वर्षांत मुंबईतील सर्व ५० प्रमुख नाल्यांमधील प्लास्टिक कचरा गोळा करण्याची योजना आखत आहे. याबाबत स्लॅट यांनी सांगितले की, मुंबईतील समुद्राच्या भरती-ओहोटीमुळे हे काम करणे थोडे आव्हानात्मक आहे. येथील नद्यांवर भरती-ओहोटीचा मोठा परिणाम होतो. वाशी खाडीत भरती आल्यावर प्लास्टिक कचरा अनेकदा १० किलोमीटर मागे फेकला जातो. त्यामुळे समुद्राकडे जाणारा आणि भरतीसोबत उलट दिशेला जाणारा कचरा दोन्ही गोळा करता येईल, अशा पद्धतीने ही यंत्रे तयार केली जातील.

जगातील सर्वाधिक प्‍लास्‍टिक प्रदूषण करणार्‍या शहरांमध्‍ये मुंबईचा समावेश

जगभरातील ज्या ३० शहरांमधून नद्यांवाटे सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण होते, त्यामध्ये मुंबईचा समावेश आहे. जगातील एकूण नदी-प्रदूषणापैकी एक तृतीयांश (सुमारे ३३%) प्रदूषण या ३० शहरांतून होते. प्रदूषण रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ( एमपीसीबी) यांनी संयुक्‍तपणे न ट्रॉम्बे आणि मालाड या ठिकाणी प्लास्टिक कचरा अडवणारी यंत्रे दररोज चालवण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीकडे सोपवण्यात आल्‍याचे महापालिका प्रशासनाने स्‍पष्‍ट केले आहे.

मनपाने प्रदूषण रोखण्‍यासाठी आजवर कोणत्‍या उपाययोजना केल्‍या?

मुंबईतील नाल्यांमधील कचरा समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध ठिकाणी 'फ्लोटिंग बूम्स' (तरंगणारे अडथळे) बसवले आहेत. जुलै २०२२ मध्ये पश्चिम उपनगरात ६, यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये पूर्व उपनगरात ८ यंत्रे कार्यान्वित केली आहेत. कंपन्यांच्या मदतीतून (CSR) आणखी ३ यंत्रे बसवण्यात आली आहेत. हे तरंगणारे पट्टे पाण्यावरचा कचरा अडवतात. तो कचरा बाहेर काढतात. महापालिकेने दिलेल्‍याआकडेवारीनुसार, पश्चिम उपनगरातील यंत्रांनी आतापर्यंत सुमारे ८,००० मेट्रिक टन कचरा काढला असून, तिथे दररोज १ ते १.५ टन कचरा जमा होतो. तसेच पूर्व उपनगरातून आतापर्यंत तब्‍बल २५० मेट्रिक टन कचरा गोळा करण्यात आला आहे.

'जलमार्गातील प्लास्टिक प्रदूषणात घट; पॅकेजिंग कचऱ्याचे मोठे आव्हान'

"पुनर्वापर (Recycle) करता येण्यासारखे मौल्यवान प्लास्टिक जलमार्गात पोहोचण्यापूर्वीच गोळा केले जाते आहे. मात्र नद्या किंवा नाल्यांमध्ये मुख्यत्वे कमी मूल्याचे 'पॅकेजिंग प्लास्टिक' राहते त्‍याचे पर्यावरणासाठी मोठे आव्हान आहे, असेही बोयन स्लॅट यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT