

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील किनारी भागात, विशेषतः निवासी वसाहतीजवळील रेस्टॉरंट्स, बार आणि नाईट क्लबमधून होणाऱ्या ध्वनिप्रद्वणाविरोधात गेल्या काही वर्षांपासून नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. गेल्या पाच महिन्यांत राज्यात ध्वनिमर्यादा ओलांडल्याची तब्बल ७५० प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत त्यात किनारपट्टी भागातील प्रकरणे अधिक आहेत.
या पार्श्वभूमीवर, गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ध्वनी निरीक्षण व कारवाई अधिक कठोर केली आहे. मंडळाच्या ऑनलाइन ध्वनी निरीक्षण प्रणालीद्वारे ही उल्लंघने नोंदली गेली असून, सध्या गोव्यातील किनारपट्टीवरील ३८ आस्थापनांमध्ये ध्वनी निरीक्षण यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत.
ध्वनीमर्यादा ओलांडली जात असल्याचे आढळल्यास संबंधित पोलीस यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाला तात्काळ माहिती दिली जाते.
'राउंड-द-क्लॉक' निरीक्षणामुळे नियमभंग करणाऱ्यांवर त्वरित कारवाई शक्य होत असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. अधिक अचूक, टिकाऊ आणि विश्वासार्ह ध्वनिप्रदूषण निरीक्षण प्रणाली अंतिम करण्याच्या प्रक्रियेत मंडळ आहे.
सध्या वापरात असलेल्या महागड्या प्रणालीपेक्षा अधिक परिणामकारक व्यवस्था उभारण्यावर मंडळाचा भर आहे. मंडळाला सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत ध्वनीप्रदूषणासंदर्भात ५० थेट तक्रारी प्राप्त झाल्या असून, चोवीस तास हेल्पलाईनवर आणखी १३५ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. उघड्यावर संगीत वाजवणाऱ्या २८ आस्थापनांकडे आवश्यक परवानगी आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे.
मंडळाकडून अचानक तपासण्या सुरू असून, आतापर्यंत २६ ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. ऑक्टोबरपासून पोलिसांना तीन वेळा पत्रव्यवहार करून, तक्रारींवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती मागवण्यात आली आहे.
आवश्यक असल्यास मंडळाचे कर्मचारी साक्षीदार म्हणून वापरता येतील, असेही पोलिसांना कळवण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार गोव्यासाठी ध्वनी मॅपिंग अभ्यास आणि कृती आराखडा अंतिम टप्प्यात आहे.
या अहवालासंदर्भात उपकरण पुरवठादार संस्थेकडे काही शंका उपस्थित करण्यात आल्या असून, अहवाल अंतिम झाल्यानंतर अधिक आस्थापनांना ध्वनी निरीक्षण यंत्रणा बसवण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास पर्यावरणीय भरपाई आकारण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.