मुंबई : ‘54 वर्षांच्या महिलेने देहदान केलं गं, वाचलीस का ती बातमी?’ आईने मुलीला विचारलेला साधा प्रश्न. मुलीने होकार दिला. त्यावर आई म्हणाली, ‘आपणही देहदान केलं पाहिजे, किमान अवयवदान तरी व्हावं.’ मुलगीही ठामपणे म्हणाली, ‘हो आई, आपण नक्की करू.’ दोन-तीन वर्षांपूर्वी झालेला हा संवाद अखेर अंधेरी येथील क्रिटिकल केअर रुग्णालयात प्रत्यक्षात उतरला.
किमया पाटील यांनी आपल्या आई साधना मधुकर वर्तक (65) यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांचे यकृत आणि दोन मूत्रपिंड दान करण्यात आले. या अवयवदानातून तिघांना जीवनदान मिळाले.
साधना वर्तक या वसई विकास सहकारी बँकेत कार्यरत होत्या. पाच वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यानंतर त्या शांत आयुष्य जगत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना तीव्र डोकेदुखी सुरू झाली. तपासणीनंतर सिटी स्कॅनमध्ये ऍन्युरिझम असल्याचे निदान झाले. त्यानंतर शस्त्रक्रिया (स्कोपी) करण्यात आली.
शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती; मात्र 48 तासांत मेंदूजवळ रक्तस्राव झाला. त्याठिकाणी संसर्ग होऊन ब्रेन स्टेम डेड अशी स्थिती निर्माण झाली. डॉक्टरांनी परिस्थिती स्पष्ट केल्यानंतर कुटुंबियांनी आईचा पूर्वीचा निर्णय लक्षात ठेवत अवयवदानास संमती दिली.
‘आईने अवयवदानाचा निर्णय आधीच घेतला होता. वडिलांनाही तसे सांगून ठेवले होते. तिची इच्छा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य होते,’ असे किमया पाटील यांनी सांगितले.
मुंबईतील यंदाचे हे 13 वे अवयवदान ठरले आहे. आई-मुलीतील संवादातून साकारलेला हा संकल्प आता इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. किमया यांनी स्वतःही अवयवदान करण्याचा निश्चय व्यक्त केला आहे.