मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी नव्या मतदान यंत्रांची मागणी करूनही त्यांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे एक सदस्यीय पद्धत असलेल्या मुंबईत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वापरलेली भारत निवडणूक आयोगाची इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरली जाणार आहेत. तसेच, राज्यातील उर्वरित 28 महापालिकांमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या यंत्रांचा वापर केला जाणार आहे.
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत आहे. मुंबई वगळता उर्वरित 28 महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती आहे. येथे मतदाराला तीन, चार किंवा पाच अशी मते द्यावी लागणार आहेत. या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग आपली स्वतःची मतदान यंत्रे वापरणार आहे.
मुंबईतील एक सदस्यीय प्रभाग पद्धतीसाठी मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने सरकारकडे केली होती. मात्र, सरकारने अशी मतदान यंत्रे उपलब्ध न करून दिल्याने निवडणूक आयोगाला मुंबईसाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असलेली ईव्हीएम वापरावी लागणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी बुधवारी दिली.
मुंबई शहरातील 227 प्रभागांमध्ये निवडणूक लढणाऱ्या 1700 उमेदवारांचे राजकीय भवितव्य गुरुवारी मतपेटीत बंद होणार असतानाच शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीत अडचण आलीच तर ‘पाडू’ हे नवे यंत्र सज्ज ठेवण्यात आल्याने विरोधकांच्या गोटात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. हे पाडू कुणाला तरी पाडण्यासाठीच आणले की काय, या प्रश्नाने सर्वांच्याच मनात घर केले.=
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 140 ‘पाडू’ची उपलब्धता करून देण्यात आली आहे. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत मतमोजणीसाठी ‘पाडू’ची गरज भासल्यास बेल कंपनीच्या तंत्रज्ञांच्या उपस्थितीत त्याचा वापर करावा. त्याचबरोबर ‘पाडू’च्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या वतीने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखविले आहे.
मुंबईत गुरुवारी सुमारे 1 कोटी 3 लाखपेक्षा जास्त मुंबईकर मतदान करतील. दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीत मुंबईकरांनी कोणाच्या बाजूने कौल दिला, हे दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होईल.
निवडणूक आयोगाने राज्यभरातील एकूण 3 कोटी 48 लाख 39 हजार 337 मतदारांकरिता एकूण 39 हजार 92 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. या मतदानासाठी 43 हजार 958 कंट्रोल युनिट आणि 87 हजार 916 बॅलेट युनिट बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था केली आहे.