

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे 67 नगरसेवक बिनविरोध निवडून येण्यास आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समीर गांधी यांनी बिनविरोध निवडी आणि नोटासंदर्भात दाखल केलेल्या दोन्ही याचिका सुनावणी घेण्यास मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने नकार दिला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कल्याण-डोंबिवली,पिंपरी-चिंचवड, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत सत्ताधारी पक्षाचे मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून आणले गेले.
ज्या ठिकाणी संशयास्पदरीत्या उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तेथील परिस्थितीची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, त्या चौकशीवर उच्च न्यायालयाची देखरेख असावी, बिनविरोध निवडीसाठी विशिष्ट मतसंख्या निश्चित करीत सरकारने कायद्यात आवश्यक ती सुधारणा करावी, बिनविरोध निवडणूक घोळाची सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित प्रभागांतील निवडणुकीच्या निकालाला स्थगिती देण्यात यावी, अशा मागण्या अविनाश जाधव आणि गांधी यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकांमध्ये ॲड. असिम सरोदे यांनी केल्या होत्या.
ठाण्यातील एका कामगार संघटनेचे अजय नाडर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना ठाणे महानगरपालिकेतील बिनविरोध निवडून आलेल्या प्रभागांमध्ये उर्वरित उमेदवार आणि नोटा पर्यायाच्या बाजूने पडलेल्या एकूण मतांची नोंद करून त्यानंतरच निकाल जाहीर करण्याचे आयोगाला आदेश द्यावेत, अशीही विनंती याचिकेत केली होती.
या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी ॲड.असीम सरोदे यांनी ऑनलाईन युक्तिवाद करताना याचिकाही तत्सम निवडणुकीशी संबंधित आहे. आम्ही या निवडणुकीला विरोध करत नाही, परंतु बिनविरोध निवड होतेय त्याला आमचा विरोध असल्याचा दावा केला. खंडपीठाने उलट याचिकाकर्त्यांनाच चांगलेच धारेवर धरले, ‘तुम्ही चुकीची वक्तव्ये करून न्यायालयाची दिशाभूल करू नका’, असा दम देत दंड ठोठावण्याचे संकेत दिले. शेवटी खंडपीठाने याचिकांवर सुनावणी घेण्यास नकार देत याचिका फेटाळून लावल्या.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांमध्ये 67 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
यात कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे सर्वाधिक, भाजपच्या 15, तर शिवसेनेच्या 7 अशा 22 उमेदवारांचा समावेश आहे.
जळगावमध्ये 12 जण बिनविरोध निवडून आले, त्यात भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी 6-6 उमेदवारांचा समावेश आहे.
भिवंडीत भाजपचे सहा, तर शिवसेनेचे दोन असे आठ उमेदवार बिनविरोध विजयी झाले.
ठाण्यात शिवसेनेचे सात, पनवेलमध्ये भाजपचे सहा, तर अपक्ष एक असे सात उमेदवार बिनविरोध झाले.
अहिल्यानगरमध्ये भाजपचे तीन, तर राष्ट्रवादीचे दोन असे पाच उमेदवार विजयी झाले.
धुळ्यात भाजपचे चार उमेदवार विजयी झालेत.
पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्येभाजपचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले आहेत. मालेगावमध्ये इस्लामिक पार्टीचा एक उमेदवार विजयी झाला आहे.
या सर्व उमेदवारांच्या निवडीमागे सत्ताधाऱ्यांचा राजकीय दबाव, धमकी कारणीभूत असल्याचा दावा याचिकेत केला होता. या प्रकरणात उच्च न्यायालय कोणता निर्णय देतेय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.