नवी मुंबई : हरमनप्रीत कौर (नाबाद 71) व निकोला कॅरे (नाबाद 38) यांनी चौथ्या गड्यासाठी 84 धावांची अभेद्य भागीदारी साकारत मुंबई इंडियन्सला गुजरात जायंटस्विरुद्ध एकतर्फी विजय मिळवून दिला. महिला प्रीमियर लीगमधील या साखळी सामन्यात प्रारंभी गुजरात जायंटस्ने जॉर्जिया वेरेहॅम (नाबाद 43) आणि भारती फुलमाली (नाबाद 36) यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर 5 बाद 192 धावांचा डोंगर उभा केला. मुंबईनेही तोडीस तोड प्रत्युत्तर देत 19.2 षटकांत केवळ 3 गड्यांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले.
विजयासाठी 193 धावांचे आव्हान असताना मुंबईच्या दोन्ही सलामीवीर गुणलन कमलिनी (13) व हेली मॅथ्यूज (22) लागोपाठ अंतराने बाद झाल्या. त्यानंतर अमनज्योत कौर 40 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली. मात्र, हेच गुजरातसाठी या लढतीतील शेवटचे यश ठरले. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने आपल्या लौकिकाला साजेशी 71 धावांची खेळी साकारत कॅरेच्या साथीने विजयाचे सोपस्कार अगदी सहजपणे पूर्ण करून दिले.
प्रारंभी, वेरेहॅमने नाबाद 43 व फुलमाली 36 च्या फटकेबाजीमुळे गुजरातने 192 धावांपर्यंत मजल मारली. फुलमालीच्या या वादळी खेळीमुळे गुजरातने अखेरच्या 3 षटकांत तब्बल 49 धावा कुटल्या आणि एक मजबूत धावसंख्या उभारली. या लढतीत नाणेफेक जिंकून मुंबईने गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. डावाच्या सुरुवातीलाच, मुंबईची 17 वर्षीय यष्टिरक्षक गुणालन कमलानीने बेथ मुनीचा सोपा झेल सोडला. मुनीने या जीवदानाचा फायदा घेत हेली मॅथ्यूजच्या दुसऱ्याच षटकात सलग दोन चौकार मारले. सोफी डिव्हाईन (8) बाद झाल्यानंतर, मुनी आणि कनिका आहुजा यांनी पॉवर प्लेमध्ये संघाची धुरा सांभाळली.
गुजरात जायंटस् 20 षटकांत 5/192 (जॉर्जिया वेरहॅम नाबाद 43, भारती फुलमाली नाबाद 36, कनिका आहुजा 35, बेथ मुनी 33).
मुंबई इंडियन्स : 19.2 षटकांत 3/193 (हरमनप्रीत कौर 43 चेंडूत नाबाद 71, निकोला कॅरे 23 चेंडूंत नाबाद 38. रेणुका, केशवी, सोफी प्रत्येकी 1 बळी).
दिल्ली कॅपिटल्स महिला वि. यूपी वॉरियर्स महिला
वेळ : सायंकाळी 7.30 वाजता