

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी विविध पदवी व एकत्रित अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश नोंदणीस आज (14 जानेवारी)पासून सुरुवात होत आहे. यामध्ये बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (बी.एचएमसीटी), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (बीसीए), बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), एमबीए (इंटिग्रेटेड) आणि एमसीए (इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 16 फेब्रुवारीपर्यंत खुली राहणार आहे.
सीईटी सेलने एमएचटी सीईटी (पीसीएम व पीसीबी समूह), एमबीए/एमएमएस, एमसीए, 3 व 5 वर्षीय एलएलबी, बी.एड., एम.एड., बीएडएमएड (तीन वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम), एम.पी.एड. तसेच एम.एचएमसीटी या अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश परीक्षांची नोंदणी आधीच सुरू झाली आहे. उर्वरित बी.डिझाईन, एएसी (फाईन आर्ट्स), डीपीएन/पीएचएन (वैद्यकीय) आणि नर्सिंग अभ्यासक्रमांच्या सीईटी नोंदणीसही लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती सीईटी कक्षाने दिली आहे.
विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध होण्यासाठी आणि त्यांची पडताळणी सुलभ व्हावी, यासाठी यावर्षीपासून सीईटी प्रवेश नोंदणीसाठी ‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाऊंट रजिस्ट्री (अपार) आयडी’ बंधनकारक करण्यात आला आहे.