

मुंबई : राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना पोलिसांनी 503 जणांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये 53 जणांना तडीपारीची कारवाई, तर 14 जणांना मकोका लावण्यात आला आहेत.
बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मिरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महानगरपालिकांचा निवडणूक प्रचार आज संपला असला तरी,
येथील निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि पोलिसांनी ही कंबर कसली होती. असे असतानाही या पालिका क्षेत्रांमध्ये विविध प्रकारचे गुन्हे घडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये बाधा येऊ नये यासाठी पोलिसांची विविध पथके कार्यरत होती. या पथकांनी एमपीए 55, 56 आणि 57 अंतर्गत 436, मकोका अंतर्गत 14, तर एमपीडीएनुसार 53 जणांवर कारवाई केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे आणि अजित पवार यांच्या पुणे शहरात निवडणुका होत्या. त्यामुळे पोलिसांनी विशेष लक्ष देऊन त्या ठिकाणी कारवाई केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
पुण्यात सर्वाधिक एकूण 28 समाजकंटकांविरोधात कारवाई केली आहे.त्यापैकी आठ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यात 17 जणांवर कारवाई केली आहे.