

राजकोट : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना बुधवारी राजकोट येथे रंगणार आहे. भारतीय संघ सध्या फॉर्मात असला तरी, राजकोटमधील इतिहास टीम इंडियासाठी फारसा सुखद राहिलेला नाही. या मैदानावरील भारताची आकडेवारी पाहता, गिलच्या नेतृत्वाखालील संघाला विजयासाठी विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.
भारतीय संघ कागदावर प्रबळ वाटत असला आणि न्यूझीलंडला नमवण्याची क्षमता त्यांच्यात असली, तरी राजकोटमधील 'ट्रॅक रेकॉर्ड' भारताच्या विरोधात आहे. या मैदानावर भारताने विजयापेक्षा पराभवच अधिक पचवले आहेत.
राजकोटच्या या स्टेडियमवर २०१३ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंतच्या प्रवासावर नजर टाकल्यास भारताची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
२०१३ : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारताला ९ धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला.
२०१५ : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात भारताचा १८ धावांनी पराभव झाला.
२०२० : या मैदानावर भारताला पहिला विजय मिळाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारताने ३६ धावांनी विजय संपादन केला होता.
२०२३ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्याच दुसऱ्या सामन्यात भारताला पुन्हा ६६ धावांनी पराभवाचा धक्का बसला.
थोडक्यात सांगायचे तर, या मैदानावर खेळल्या गेलेल्या चार सामन्यांपैकी भारताला केवळ एकच विजय मिळवता आला आहे, तर तीन सामन्यांत पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
या मैदानाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला, तर एक महत्त्वाची बाब समोर येते, येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचे पारडे जड राहिले आहे. भारताने जो एकमेव विजय मिळवला, तो प्रथम फलंदाजी करतानाच मिळाला होता. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या सामन्यात टॉस अत्यंत कळीची भूमिका बजावेल. जो संघ टॉस जिंकेल, तो प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्यास प्राधान्य देण्याची शक्यता आहे.
राजकोटच्या खेळपट्टीवर जर एखाद्या संघाने ३०० पेक्षा अधिक धावांचा डोंगर उभारला, तर त्याचा पाठलाग करणे प्रतिस्पर्धी संघासाठी कठीण जाते. भारताकडे रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल अशी तगडी फलंदाजीची फळी आहे. शुभमन गिलचा सद्याचा फॉर्म पाहता भारतीय गोटात समाधानाचे वातावरण आहे. मात्र, २०२० नंतर पुन्हा एकदा या मैदानावर विजयाचा गुलाल उधळण्यात टीम इंडियाला यश येते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.