Mumbai Hospital Canteen Pudhari
मुंबई

Mumbai Hospital Canteen: गॅस टंचाईचा फटका रुग्णालयांनाही; मुंबईतील जे.जे., केईएम, नायरमध्ये उपाहारगृहांमध्ये अन्नटंचाई

व्यावसायिक एलपीजी सिलिंडर पुरवठा कमी; रुग्ण, नातेवाईक व निवासी डॉक्टरांना दाल-खिचडी व सँडविचवरच दिवस काढण्याची वेळ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता सर्वसामान्यांवर जाणवू लागला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर मर्यादा आल्याने मुंबईतील जे. जे., केईएम आणि नायर रुग्णालयांमधील खासगी उपाहारगृहांमध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह निवासी डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी आणि शिकाऊ परिचारिकांना फक्त दाल-खिचडी, सँडविच आणि चहावरच दिवस काढावा लागत आहे.

या मोठ्या शासकीय व महापालिका रुग्णालयांमध्ये दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक सकाळी लवकर घर सोडून रुग्णालयात पोहोचत असल्याने नाश्ता आणि जेवणासाठी ते प्रामुख्याने रुग्णालय परिसरातील खासगी उपाहारगृहांवर अवलंबून असतात. रुग्णालय प्रशासनाकडून दाखल रुग्णांनाच जेवण दिले जात असल्याने नातेवाईकांसाठी ही उपाहारगृहेच मुख्य आधार ठरतात.

केईएम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयात रूग्णांसाठी जेवण बनविण्यासाठी पाईप गॅस वापरत असल्याने जेवण बनविण्यासाठी कोणतीही समस्या येत नाही मात्र व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्याने रूग्णालयाच्या आवारातील खासगी उपाहारगृहांमधील सिलिंडरचा साठा संपत आला आहे. परिणामी मागील दोन दिवसांपासून तळलेले पदार्थ पूर्णपणे बंद करण्यात आले असून फक्त दाल-खिचडी, सँडविच, चहा व बिस्किटे यांचीच विक्री सुरू आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागात येणारे रुग्ण, रुग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांसह निवासी डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी आणि शिकाऊ परिचारिकांना मर्यादित पर्यायांवरच दिवस काढावे लागत आहेत.

काही ठिकाणी फक्त एक-दोन सिलिंडर शिल्लक असून काही उपाहारगृहांमधील सिलिंडर पूर्णपणे संपले आहेत. पुढील दोन दिवसांत गॅसचा पुरवठा न झाल्यास ही उपाहारगृहे बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण, नातेवाईक तसेच वसतिगृहात राहणारे विद्यार्थी, डॉक्टर आणि परिचारिका यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भीती आहे.

वैद्यकीय विद्यार्थी, परिचारिका आणि निवासी डॉक्टर यांच्या वसतिगृहातील उपाहारगृहांसाठी व्यावसायिक सिलिंडर लागतात. मात्र सध्या त्यांचा पुरवठा थांबल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले. महापालिका रुग्णालयात रूग्णांसाठी असलेल्या उपाहारगृहांमध्ये पाईप गॅस असल्याने गॅस टंचाईचा परिणाम जाणवत नसल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT