Sangram Patil Bombay High Court: भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आणि युट्यूबर डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर दोन वेळा रोखण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संग्राम पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना नोटीस बजावत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेवरील पुढील सुनावणी 4 फेब्रुवारीला होणार आहे.
संग्राम पाटील 10 जानेवारीला लंडनमधून भारतात आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले होते. मात्र मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्याबरोबर मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांची काही तास चौकशी करण्यात आली.
यानंतर संग्राम पाटील 19 जानेवारीला पुन्हा लंडनला परत जाणार होते. मात्र यावेळीही इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना विमानतळावरच थांबवलं. संग्राम पाटील यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या नावावर लुकआऊट सर्क्युलर (LOC) जारी करण्यात आले असून ते अद्याप रद्द न झाल्यामुळे त्यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी मिळू शकत नाही, असं इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सांगितलं.
या प्रकरणात संग्राम पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून, आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा तसेच LOC देखील रद्द करावा, अशी मागणी केली आहे. आज झालेल्या सुनावणीत संग्राम पाटील यांच्या वकिलांनी LOC बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला.
दुसरीकडे राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आलं की, संग्राम पाटील तपासाला सहकार्य करत नाहीत, त्यामुळे LOC कायम ठेवण्याची गरज आहे.
संग्राम पाटील यांच्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे. त्याच प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत, राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना नोटीस बजावली आहे आणि याचिकेवर उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता पुढील सुनावणी 4 फेब्रुवारीला होणार आहे.