

Dr. Sangram Patil detained
मुंबई : ब्रिटनमधील प्रसिद्ध डॉक्टर आणि भाजप सरकारविरोधात सडेतोड भूमिकेसाठी ओळखले जाणारे डॉ. संग्राम पाटील यांना शनिवारी (दि. १०) लंडनहून मुंबईत येताच गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. नेमका हा काय घटनाक्रम होता, नेमकं कशासाठी त्यांना ताब्यात घेतलं होतं, याबाबत डॉक्टर संग्राम पाटील यांनी 'पुढारी न्यूज'शी संवाद साधला.
भाजप नेत्यांविरुद्ध आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट केल्याच्या आरोपावरून डॉ. पाटील यांच्यावर बदनामीची तक्रार आहे. भाजपच्या सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी निखिल भामरे यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यामध्ये म्हटलं होतं की, डॉ. संग्राम पाटील यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावरून आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याबरोबरच आमचे पक्षाचे विचारधारेचे समर्थन करणारे व त्यावर विरोध करणारे समाजातील गटांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण करण्याच्या इराद्याने चुकीची आणि खोटी माहिती जाणूनबुजून इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रसारित केली आहे. यानंतर संग्राम पाटील मुंबई विमानतळावर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची अडवून 15 तास चौकशी करण्यात आली.
यासंपूर्ण घटनाक्रमाबाबत 'पुढारी न्यूज'चे भूषण चिंचोरे यांच्याशी बोलताना डॉ. संग्राम पाटील म्हणाले, पावणे शनिवार पहोट दोनला मुंबई विमानतळावर आलो. इतिहाद एअरवेजने मी मँचेस्टरवर निघालो होतो. मायग्रेशन काउंटरवरील अधिकार्याने मला सांगितले की, पोलीस तुम्हाला अरेस्ट करणार आहेत.आम्ही जवळजवळ चार ते पाच तास एअरपोर्टला होतो. त्यानंतर मुंबईतल्या परळ-लोअर परळच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मला तिथून ताब्यात घेतलं. यानंतर त्यांच्या ऑफिसला नेलं. सायंकाळी पाचपर्यंत आम्ही तेथेच होतो.
चौकशीच्या नावाने फार काही झालं नाही. माझा जबाब मी नोंदवला. मला त्यांनी नोटीस दिली; याच्या पलीकडे फार काही झालं नाही. पण ते दिवसभर त्यांची प्रक्रिया चाललेली होती. तिथले ऑफिसर जे होते ते सीनियर लोकांशी बोलत राहिले. आम्हाला माहीत नाही त्यांची काय चर्चा झाली. त्यांनी शेवटी पत्र दिलं. आम्हाला पाच वाजता जायला परवानगी दिली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्या पोस्टमध्ये मी नरेंद्र मोदींच्या संदर्भात नुकतेच ली सुब्रमण्यम स्वामी आणि कपिल मिश्रा, जे पूर्वी आम आदमी पार्टीमध्ये होते, त्यांनी जेव्हा विधानसभेत भाषण करून नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या काळात स्नूपगेट प्रकरण झालं होतं. त्यावेळी सुब्रमण्यम स्वामींनी नरेंद्र मोदींच्या चारित्र्याबद्दल काही शंका उपस्थित केल्या होत्या. मी या संदर्भात पोस्ट केली होती की, मोदींचे समर्थक आहेत, हे प्रश्न का विचारत नाहीत, हे मुद्दे क्लिअर का नाही करत. ज्याच्यामुळे देशापुढे आणि जगापुढे हे स्पष्ट होईल की, नेमकं सत्य काय आहे आणि त्याच्यामुळे मोदींच्या प्रतिमेलाही फायदा होईल. याचा देशालाही फायदा होईल. म्हणून ही पोस्ट आहे.
मी ब्रिटिश नागरिक असल्याने माझी अटक टळली याबाबत मला सांगता येणार नाही. कारण ज्या सोशल मीडिया पोस्टबाबत अट करणार होते त्यासंदर्भातील एफआयआर दाखल केला आहे, यामध्ये विसंगती आहे. त्यामुळे नेमकं कोणत्या कारणास्तव मला अटक करणार होते, याची माहिती नाही. जेव्हा पोलिसांना भेटलो तेव्हा तेही अट करण्याच्या मनस्थितीत दिसले नाही, असेही डॉ. संग्राम पाटील यांनी सांगितले.
ब्रिटिश पासपोर्टमुळे मला प्रोटेक्शन मिळालं, असे नाही. ब्रिटिश पासपोर्ट असेल आणि तुम्ही मोठा गुन्हा केला असेल तर पोलीस तुम्हाला अटक करू शकतात. त्यामुळे मी ब्रिटीश नागरिक असल्याने मला अटक झाली नाही हा प्रश्नच नाही. मुळात ते मी केलेल्या पोस्टला गुन्हा म्हणतात. माझ्या दृष्टीने हा माझ्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे.
मी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना किंवा त्यांच्या समर्थकांना प्रश्न विचारलेला आहे. आजही भारत लोकशाही देश आहे. देश संविधानावरच चालतो. मी जर कुठल्या मध्य आशिया देशात गेलो आणि तिथल्या राजाला असा जाहीर प्रश्न विचारला, तर तिथे गुन्हा ठरेल; पण भारतात राजेशाही नाही. ही लोकशाही आहे. ब्रिटीश पासपोर्टमुळे माझा बचाव झाला असे मला वाटत नाही. जर गुन्हा मोठा असेल तर पोलीस कोणालाही अटक करू शकतात. मात्र, माझ्या दृष्टीने ही पोस्ट म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. भारत आजही संविधानावर चालणारा लोकशाही देश आहे. मी कोणा राजाला प्रश्न विचारलेला नाही. लोकशाहीत अशा पोस्ट गुन्हा ठरू शकत नाहीत, असेही डॉ. संग्राम पाटील म्हणाले.