मुलुंड : मुंबईच्या चारही वेशींवर भव्य प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर उभारण्याचा संकल्प नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी केला आहे. त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी सूचना त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईला दररोज लाखो पर्यटक भेट देत असतात. मुंबईत प्रवेश करताना पर्यटकांना शहराची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी, यासाठी मुंबईतील चारही प्रवेशद्वारांवर भव्य प्रवेशद्वार व क्लॉक टॉवर उभारण्याचे नियोजन आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड चेक नाका, मुलुंड ऐरोली मार्ग, वाशी-मानखुर्द मार्ग असे तीन प्रवेशमार्ग आहेत, तर पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर चेकनाका हा एक प्रवेशमार्ग आहे. या चारही मार्गांवर सौंदर्यीकरण, सुशोभीकरण व क्लॉक टॉवर उभारण्यात आले तर जागतिक स्तरावर मुंबईची ओळख निर्माण होईल, असे महापौरांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
क्लॉक टॉवर अर्थात वेळ दर्शवणाऱ्या घड्याळाचा मनोरा. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील संकुलातील राजाबाई क्लॉक टॉवर हा सुमारे 85 मीटर उंच मनोरा प्रसिद्ध आहे. व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील हा मनोरा पर्यटकांसाठी खास आकर्षण असते. असेच घड्याळ मनोरे मुंबईच्या प्रवेशद्वारांवर उभारण्याचे नियोजन आहे.