

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगर येथील रस्त्यावरील एका अनधिकृत पानटपरीवर ड्रग्ज आढळून आले. या पानटपरीवर चारकोप विधानसभेचे आमदार योगेश सागर यांनी स्टिंग ऑपरेशन करत टपरीमधील एका बॉक्समध्ये साठवून ठेवलेले ड्रग्ज बाहेर काढले.
कांदिवली पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत पानटपऱ्या सुरु आहेत. या पानटपऱ्यांवर सिगारेटच्या नावाखाली गांजाची सर्रासपणे विक्री केली जात आहे. याकडे स्थानिक पोलीस आणि पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने टपरीचालकांचे चांगले फावले आहे.
कांदिवलीत असलेल्या अवैध पानटपऱ्या या शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस अशाठिकाणी थाटलेल्या आहेत. परिणामी विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या आहारी जात आहे. याकडे आता राजकीय नेत्यांसह पोलीस आणि पालिका प्रशासनाने धडक मोहीम उभारून अशा टपऱ्यांवर बुलडोजर फिरविण्याची मागणी कांदिवलीकरांकडून केली जाऊ लागली आहे.
कांदिवली पूर्वकडील असलेल्या ठाकूर व्हिलेज, समता नगर या मुख्य रस्त्यावरील ठाकूर महाविद्यालय, अतिरिक्त पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग यांच्या कार्यालयासमोर सुमारे 10 अवैध पानटपऱ्या सुरू असून या टपऱ्यावर मोठ्या प्रमाणात सिगरेट, गुटखा आणि भांगेच्या गोळ्यांची विक्री होत आहे. तरीसुध्दा अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
येथील सर्व टपऱ्यांवर ठाकूर कॉलजेमधील मुले, मुली खुलेआम रस्त्यावर सिगरेटचे झुरके मारत उभे असतात. यामुळे यांचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे आता येथील टपऱ्यांवरही कारवाईची मागणी ठाकूर व्हिलेजकरांनी केली आहे.