Dog Attack Pudhari
मुंबई

Mumbai Dog Bite Cases: मुंबईत कुत्रा चावण्याच्या घटनांत वाढ; पाच वर्षांत ५.२९ लाख नागरिकांना चावा

माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार २०२१ ते २०२५ या काळात कुत्रा चावण्याच्या घटनांची नोंद; २०२५ मध्ये सर्वाधिक प्रकरणे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत मोकाट कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरणासाठी उपाययोजना केल्या जात असल्या, तरी चाव्याच्या घटनांना आळा बसलेला नाही.

२०२१ ते २०२५ या पाच वर्षांत तब्बल ५ लाख २९ हजार ६५० नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद झाली आहे. २०२५ मध्ये सर्वाधिक १ लाख ५४ हजार १७ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. माहिती अधिकारातील अर्जांना मिळालेल्या उत्तराच्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.

२०२१ मध्ये कुत्रा चावल्याच्या ६१ हजार ३३२ घटना नोंदविण्यात आल्या होत्या. २०२२ मध्ये ही संख्या ७९ हजार २५२, २०२३ मध्ये १ लाख ६ हजार ७९७, तर २०२४ मध्ये १ लाख २८ हजार २५२ इतकी होती. २०२५ मध्ये या घटनांनी दीड लाखांचा टप्पा ओलांडला. दरवर्षी चावा घेण्याच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेकडून कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत २५ हजार २११ कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. त्यानंतरच्या आठ महिन्यांत सुमारे १२ हजार कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. तसेच एक लाखांहून अधिक मोकाट कुत्र्यांना लस दिल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

भटक्या कुत्र्यांना डिवचल्यास हल्ल्याची शक्यता

देवनार पशुवधगृह विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीम पाशा पठाण यांच्या म्हणण्यानुसार, कुत्र्यांना त्रास दिल्यास किंवा डिवचल्यास ते चावा घेऊ शकतात. आजारामुळेही काही कुत्रे आक्रमक होतात. उन्हाळ्यात पाणी उपलब्ध न झाल्यास कुत्रे चिडचिडे होऊ शकतात, असे महापालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईतील मोकाट कुत्र्यांची संख्या कमी झाल्याचे

आकडेवारीतून दिसते. २०१४ मध्ये करण्यात आलेल्या गणनेनुसार शहरात ९५ हजार १७२ मोकाट कुत्रे होते.

२०२४ मध्ये ही संख्या ९० हजार ७५७ इतकी नोंदविण्यात आली. मात्र, कुत्र्यांची संख्या घटल्याचे सांगितले जात असतानाच चाव्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नसबंदी आणि लसीकरणाच्या उपाय-योजनांच्या परिणामकारकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

वेळेवर लसीकरण न झाल्याने रेबीजचा धोका

परेल येथील बै साकरबाई दिनशॉ पेटिट रुग्णालयाचे डॉ. मयूर डांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्रा किंवा मांजर चाटल्यानंतर त्याच्या नखांमुळे खरचटल्यासही संसर्गाचा धोका असू शकतो.

पाळीव प्राण्यांचे वेळेवर लसीकरण न झाल्यास त्यांच्यापासून रेबीजचा धोका संभवतो. कुत्रा किंवा मांजर चावल्यास खरचटल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT