तानसा धरण pudhari photo
मुंबई

Mumbai Dam Water Storage: मार्चमध्येच उन्हाचा तडाखा! मुंबईत पाणी कपात होणार का? पाणीसाठ्याची आकडेवारी

तलावांमध्ये भरपूर पाणी; जुलैपर्यंत पुरवठा सुरळीत, यंदा कपातीची शक्यता कमी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल ४४ टक्के म्हणजे ६ लाख ३८ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणीटंचाईची भीती नाही.

मुंबई शहराला पाणीपुरवठा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात २०२५ मध्ये समाधानकारक पाऊस पडल्यामुळे तलावातील पाणीसाठा जवळपास १०० टक्केवर पोहचला होता. त्यामुळे २०२५ च्या तुलनेत यंदा ४ टक्क्याने म्हणजे ६० हजार दशलक्ष लीटरने पाणीसाठा जास्त आहे. शहराला दररोज ३,९५० दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा होतो. म्हणजे सरासरी मुंबईला मासिक १ लाख २० हजार दशलक्ष लीटर इतके पाणी लागते. सध्याचा ६ लाख ३८ हजार पाणीसाठा लक्षात घेता, किमान चार ते साडेचार महिने शहराला पुरेल इतके पाणी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात महापालिकेला पाणी कपात करावी लागणार नाही. त्यामुळे दरवर्षी पाणीटंचाईचे टेन्शन असलेल्या मुंबईकरांना यंदा मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई शहराला दररोज सरासरी २ हजार दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करणाऱ्या राज्य सरकारच्या भातसा तलावातही सुमारे ४४ टक्के इतका पाणीसाठा आहे. सर्वाधिक ६१ टक्के पाणीसाठा नॅशनल पार्कमधील विहार तलावात असून नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलावात ५१ टक्के इतका पाणीसाठा आहे. ठाणे जिल्ह्यातील मोडक सागर तलावात मात्र ३७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मात्र मध्य वैतरणा तलावामध्ये ४१ टक्के पाणीसाठा असल्यामुळे मोडक सागरचा पाणीसाठा कमी झाला तरी मध्य वैतरणातील पाणी मोडक सागर तलावात सोडून मुंबई आणता येणार आहे. त्यामुळे आता पाण्याची चिंता सोडा, असे पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले आहे.

२० मार्च तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

अप्पर वैतरणा - १,१७,३७८ (५१.७० टक्के)

मोडक सागर - ४८,१२८ (३७.३३ टक्के)

तानसा - ५७,०८७ (३९.३५ टक्के)

मध्य वैतरणा - ७९,७९९ (४१.२३ टक्के)

भातसा - ३,१४,७३१ ( ४३.८९ टक्के)

विहार - १७,०७८ (६१.६६ टक्के)

तुळशी - ३,९११ (४८.६१ टक्के)

तीन वर्षातील पाणीसाठा ( दशलक्ष लिटर)

२० मार्च २०२४ - ४,९९,९६४ (३४.५४ टक्के)

२० मार्च २०२५ - ५,७८,२९८ (३९.९६ टक्के)

२० मार्च २०२६ - ६,३८,१११ (४४.०९ टक्के)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT