Mumbai CNG Price Hike pudhari
मुंबई

Mumbai CNG Price Hike: मुंबईत सीएनजी अन् पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Anirudha Sankpal

Mumbai CNG Price Hike: मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) सीएनजी आणि घरगुती पाईप गॅस (PNG) ग्राहकांना पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सीएनजीच्या किरकोळ विक्री दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ केली आहे, तर घरगुती पाईपद्वारे पुरवठा होणाऱ्या पीएनजीच्या दरात प्रति एससीएम (SCM) ५० पैशांची वाढ जाहीर केली आहे. हे नवीन दर २९ आणि ३० मे २०२६ च्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत.

नवे दर आणि वाढीचे कारण

या ताज्या दरवाढीनंतर मुंबई आणि परिसरात सीएनजीचा दर आता ८६ रुपये प्रति किलो झाला आहे, तर घरगुती पीएनजीचा दर वाढून ५२ रुपये प्रति एससीएमवर पोहोचला आहे. देशांतर्गत नैसर्गिक वायूचे कमी झालेले वाटप, महागड्या गॅस स्रोतांवर वाढलेले अवलंबित्व आणि आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाच्या घसरणीमुळे गॅस खरेदीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे; परिणामी हा बोजा ग्राहकांवर टाकावा लागत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

१५ दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ

विशेष म्हणजे, गेल्या १५ दिवसांतील ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी १४ मे रोजी सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढ होऊन तो ८४ रुपये प्रति किलो झाला होता. त्यानंतर आता अवघ्या दोन आठवड्यांत पुन्हा २ रुपयांची वाढ झाल्याने वाहनधारक चिंतेत आहेत. दरम्यान, २६ मे रोजी राजधानी दिल्लीत सीएनजीचे दर २ रुपयांनी वाढले होते, मात्र त्यावेळी मुंबईत दर स्थिर होते; जे आता ३० मेपासून वाढवण्यात आले आहेत.

रिक्षाचालक आणि प्रवाशांवर परिणाम

ऐन उन्हाळ्यात आणि सुट्ट्यांच्या हंगामात झालेल्या या दरवाढीमुळे सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालक आणि खाजगी वाहनधारकांचे बजेट कोलमडले आहे. या दरवाढीचा थेट फटका मुंबईतील हजारो ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना बसणार असून, आगामी काळात रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यातही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक महाग होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT