मुंबई : हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ 17 ते 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमातून ग्लोबल साऊथ देशांसाठी हवामान नेतृत्वाचा नवा मंच उभारला जाणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात जागतिक स्तरावरील शासन नेते, उद्योग क्षेत्रातील प्रमुख, हवामान तज्ज्ञ, युवक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येणार आहेत.
या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केला असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागासह एमएमआरडीए आणि मुंबई महापालिकेचे सहकार्य लाभणार आहे.
जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे मुख्य केंद्र उभारण्यात येणार असून शहरभर महाविद्यालये, समुदाय व सांस्कृतिक संस्थांमध्ये ‘हब-अँड-स्पोक’ पद्धतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई क्लायमेट वीक भारताची हवामान विषयक कृतीशील भूमिका अधोरेखित करतो. शासन, उद्योग, वित्त, तज्ज्ञ आणि युवक यांना एकत्र आणून महाराष्ट्र स्वच्छ, सुरक्षित व शाश्वत भविष्य घडवण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश यातून जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी म्हणाले, ‘मुंबईची जिद्द आणि कल्पकता हवामान संकटांसमोर ठामपणे उभी राहील. नागरिकांच्या सहभागातून उभा राहणारा हा भारतातील पहिला व्यापक हवामान चळवळीचा प्रयोग ठरेल.’
मुंबई शहरात सार्वजनिक व्याख्याने, चित्रपट प्रदर्शन, कला-संस्कृती कार्यक्रम आणि नागरिक कार्यशाळांद्वारे हवामान कृती लोकाभिमुख करण्यावर भर दिला जाणार आहे.
पहिल्या दिवशी प्रिन्स विल्यम यांच्या संकल्पनेतील ‘अर्थशॉट प्राईज’ सादरीकरणाचा विशेष कार्यक्रम होणार आहे. तसेच अंतराळवीर राकेश शर्मा आणि शुभांशु शुक्ला विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाची मांडणी अन्नप्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी शाश्वतता या तीन स्तंभांवर आधारित आहे. इनोव्हेशन चॅलेंज आयोजित करण्यात आला असून अंतिम फेरीतील कल्पनांना धोरणकर्ते व गुंतवणूकदारांसमोर सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या उपक्रमात 30 हून अधिक देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. हिलरी क्लिंटन, बिल गेट्स, राजीव शाह, आयएफसीचे इमाद फखुरी, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्यासह विविध क्षेत्रातील नेते, उद्योजक, संशोधक आणि पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झा व भूमी पेडणेकर यांचाही सहभाग असणार आहे.