BMC Election 2026 Pudhari
मुंबई

BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीत ‘हप्ता वसुली 2.0’चा मुद्दा पुन्हा पेटला; कोणते आरोप होत आहेत?

BMC Election 2026 Corruption: मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘हप्ता वसुली’ आणि भ्रष्टाचाराचे आरोप पुन्हा चर्चेत आले आहेत. विरोधकांनी महाविकास आघाडीच्या मागील कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

BMC Election 2026 Corruption: आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. सत्ता मिळवण्यासाठी सगळेच पक्ष सज्ज झाले असताना, गेल्या काही वर्षांतील कारभारावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडी यांच्या कार्यकाळाशी संबंधित कथित भ्रष्टाचाराचे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत. विरोधकांकडून हप्ता वसुली 2.0 आणि कमिशनची संस्कृती परत येईल का, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

छोट्या व्यावसायिकांवर दबाव

मुंबई ही टॅक्सी-रिक्षाचालक, फेरीवाले, छोटे दुकानदार, हॉटेल चालक यांच्या मेहनतीवर उभी आहे. मात्र, पुन्हा एकदा असा आरोप विरोधकांकडून होतोय की, शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्ता आल्यास छोट्या व्यावसायिकांवर दबाव, धमकी आणि जबरदस्तीने पैसे उकळण्याचे प्रकार वाढू शकतात. पूर्वी हप्ता म्हणून ओळखली जाणारी पद्धत पुन्हा डोके वर काढेल का, ही भीती केवळ राजकीय नाही, तर थेट सामान्य मुंबईकरांना देखील आहे.

‘सचिन वाझे’ प्रकरण

या सगळ्या चर्चांमध्ये ‘सचिन वाझे’ प्रकरणाचा उल्लेख टाळता येत नाही. अँटालिया प्रकरणानंतर समोर आलेल्या वसुलीच्या आरोपांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला होता. “जर देशातील मोठ्या उद्योगपतींनाही अशा प्रकारे लक्ष्य केलं जाऊ शकतं, तर सामान्य माणसाचं काय?” असा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे. या प्रकरणामुळे मुंबईच्या कायदा-सुव्यवस्थेवर आणि राजकीय हस्तक्षेपावर गंभीर प्रश्न निर्माण झाले होते, आणि तेच मुद्दे आता पुन्हा प्रचारात वापरले जात आहेत.

बीएमसी – विकासाची यंत्रणा की पैशांची खाण?

बृहन्मुंबई महानगरपालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते. हजारो कोटींच्या बजेटवर चालणाऱ्या या संस्थेच्या टेंडर प्रक्रिया, कंत्राटे आणि प्रकल्पांवरून सातत्याने संशय व्यक्त केला जात आहे. कमिशन खाऊन कामं वाटली जातात, मर्जीतल्या कंत्राटदारांनाच फायदा मिळतो, अशा आरोपांमुळे विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. मुंबईकरांच्या करातून जमा झालेला पैसा खरंच शहराच्या विकासासाठी वापरला गेला का, की तो राजकीय स्वार्थासाठी वळवला गेला, हा मुद्दा आता पेटला आहे.

कोविड काळातील घोटाळ्यांची आठवण

कोविडसारख्या भीषण संकटाच्या काळातही भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ही बाब जनतेला अजूनही अस्वस्थ करते. मृतदेहांच्या बॉडी बॅग खरेदीतील कथित गैरव्यवहार आणि ‘खिचडी घोटाळा’ यामुळे महाविकास आघाडीच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित झाले होते. आपत्तीच्या काळातही आर्थिक फायदा शोधण्याची वृत्ती ही राजकीय अधःपतन आहे अशी भावना अनेक मुंबईकर आणि विरोधक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT