Mumbai Rocket Firecracker Ban Pudhari
मुंबई

Mumbai Rocket Firecracker Ban: मुंबईकरांनो, फटाके फोडताना सावधान! 'या' फटाक्यांवर २५ नोव्हेंबरपर्यंत बंदी; काय आहेत नवे नियम?

Mumbai Rocket Firecracker Ban: मुंबईत फटाक्यांमुळे आगीच्या घटना वाढत असल्याने महापालिकेने २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत रॉकेट फटाक्यांवर बंदी घातली आहे.

Rahul Shelke

Mumbai Rocket Firecracker Ban: दिवाळीत फटाक्यांमुळे आगीच्या घटना वाढत असल्याने मुंबई महापालिकेने (BMC) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. थेट आकाशात उडणाऱ्या रॉकेट फटाक्यांवर २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतील वाढत्या आगीच्या घटना आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईची दाट लोकवस्ती, उंच इमारती आणि झोपडपट्ट्यांचा विचार करून महापालिकेने हा खबरदारीचा उपाय केला आहे. रॉकेट फटाके उडवल्यानंतर त्यांचे जळते अवशेष इमारतींच्या छतावर, खिडक्यांमध्ये किंवा बाल्कनीमध्ये पडू शकतात. त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते. अशा घटनांमुळे नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो.

मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक आणि खासगी ठिकाणी ही बंदी लागू असेल. निवासी इमारती, टेरेस, छत, बाल्कनी, अंगण, वाहनतळ आणि झोपडपट्ट्यांमध्येही रॉकेट फटाके उडवता येणार नाहीत.

९ नोव्हेंबरपासून २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ही बंदी लागू आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस उपायुक्त, महापालिकेचे विभागीय सहाय्यक आयुक्त आणि अग्निशमन दल यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, इतर फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, त्यांचा वापर करताना सध्याचे कायदे, न्यायालयाचे आदेश आणि संबंधित यंत्रणांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि महापालिका आयुक्तांनी हा आदेश जारी केला आहे.

फटाके फोडताना सुरक्षेला प्राधान्य द्या; महापौरांचे आवाहन

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही नागरिकांना फटाके फोडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण आहे. मात्र, या आनंदामुळे इतरांच्या जीविताला किंवा मालमत्तेला धोका निर्माण होऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या दोन दिवसांत मुंबईत फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आगीच्या गंभीर घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडताना सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व द्यावे, असे आवाहन महापौरांनी केले.

न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास मनाई आहे. नागरिकांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रॉकेट आणि आकाशात उडणारे फटाके टाळा

रॉकेट किंवा आकाशात उडणारे फटाके टाळण्याचे आवाहनही महापौरांनी केले आहे. असे फटाके अनेकदा इमारतींच्या खिडक्या, बाल्कनी किंवा टेरेसच्या दिशेने जाऊ शकतात. त्यामुळे आग लागण्याचा धोका असतो. यामध्ये निष्पाप नागरिकांच्या जीवाला आणि मालमत्तेला नुकसान पोहोचू शकते.

फटाके फोडताना इमारती, झोपडपट्ट्या आणि वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवावे. लहान मुले फटाके फोडत असतील तर त्यांच्यावर मोठ्यांनी लक्ष ठेवावे. जवळ पाण्याची बाटली किंवा अग्निसुरक्षेची साधने ठेवावीत. तसेच फटाके पेटवताना योग्य अंतर ठेवावे, असेही महापौरांनी सांगितले.

आपत्कालीन परिस्थितीत या क्रमांकांवर संपर्क साधा

फटाके फोडताना कोणतीही दुर्घटना घडल्यास घाबरून न जाता तातडीने मदत मागावी. मुंबई अग्निशमन दलाच्या १०१ किंवा मुंबई महापालिकेच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. दिवाळीचा आनंद साजरा करताना इतरांच्या सुरक्षिततेचीही जबाबदारी घ्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT