मुंबई : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे (एमएसबीटीई) राज्यस्तरीय तांत्रिक पेपर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पदविका अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा 3 ते 12 फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील विविध केंद्रांवर होणार आहे.
एमएसबीटीईशी संलग्न तसेच स्वायत्त पॉलिटेक्निकमधील केवळ अंतिम वर्षातील पदविका विद्यार्थीच या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत. सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, फार्मसी आणि केमिकल अशा विविध अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण शाखांसाठी ही स्पर्धा स्वतंत्रपणे आयोजित केली जाणार आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या विभागांतील निवडक संस्थांमार्फत स्पर्धांचे आयोजन होणार आहे. या स्पर्धेत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), स्मार्ट सिटी, नवीकरणीय ऊर्जा, ग्रीन कन्स्ट्रक्शन, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिक वाहन, औषधनिर्माण तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक अभियांत्रिकी यांसारख्या अद्ययावत व उद्योगाभिमुख विषयांवर पेपर सादर करण्याची संधी यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
स्पर्धेत विद्यार्थ्यांना फक्त लिहिलेले वाचून दाखवणे अपेक्षित नाही. 1800 ते 2000 शब्दांचा संशोधनाधारित पेपर, त्यावर आधारित 10 मिनिटांचे मुद्देसूद सादरीकरण आणि त्यानंतर पाच मिनिटांचा प्रश्नोत्तरांचा टप्पा या माध्यमातून विद्यार्थ्यांची समज, आत्मविश्वास आणि संवादकौशल्य तपासले जाणार आहेत.
परीक्षकांकडून विचारले जाणारे प्रश्न हे केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता, व्यावहारिक उपयोग आणि अंमलबजावणीवर आधारित असणार आहेत. मूल्यमापनात नाविन्य, विषयाची उपयुक्तता, सादरीकरणाची शैली आणि प्रश्नांना दिलेले प्रत्युत्तर यांना स्वतंत्र गुण देण्यात येणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा केवळ गुणांसाठी न राहता, स्वतःचा विचार ठामपणे मांडण्याची क्षमता विकसित करणारी ठरणार आहे.