मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण प्रकल्पातील गिरणी कामगारांसाठी राखीव असलेल्या घरांच्या दुरुस्तीमुळे सुमारे 2 हजार 521 घरांच्या सोडतीला विलंब झाला आहे. मात्र, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरच ही सोडत काढली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
‘एमएमआरडीए’ भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण प्रकल्पातील गिरणी कामगारांसाठी राखीव घरांच्या सोडतीला अद्याप विलंब होत असल्याबाबत विधान परिषदेतील आमदार पंकज भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नाच्या लेखी उत्तरात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माहिती दिली आहे.
येथील रांजनोली येथे 1,244 घरे, रायगड जिल्ह्यातील रायचूर येथे 1,019 घरे आणि कोल्हे (सावो व्हिलेज) येथे 258 अशी एकूण 2,521 घरे गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. या प्रकल्पातील घरे नादुरुस्त असून, अतिशय खराब स्थितीत असल्याने ही घरे दुरुस्तीनंतरच ताब्यात घेण्याची भूमिका गिरणी कामगारांनी घेतली आहे. या घरांमध्ये सद्यस्थितीत राहण्यास जाणे अत्यंत धोकादायक असल्यामुळे ती दुरुस्त झाल्याशिवाय त्यांची लॉटरी काढू नये, अशी मागणी करण्यात आली होती.
रांजनोली येथील 1,244 घरांची दुरुस्ती ‘एमएमआरडीए’ने केली असून, ही घरे म्हाडाकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच, रायचूर येथील 1,019 पैकी 500 घरांची दुरुस्ती झाली असून, उर्वरित घरांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरच सर्व घरांची सोडत म्हाडाकडून काढण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी उत्तरात स्पष्ट केले आहे.