मुंबई : दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पहिल्याच दिवशी 96 अब्ज यूएस डॉलर्स म्हणजेच 8 लाख 73 हजार 600 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे शिष्टमंडळ दावोस परिषदेत सहभागी झाले आहे. यात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्यासह एमएमआरडीएच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
एमएमआरडीए आणि एसबीजी ग्रुप यांच्या संयुक्त भागीदारीने महामुंबईतील मोक्याच्या ठिकाणी एकात्मिक लॉजिस्टिक्स, औद्योगिक आणि हायपरस्केल डेटा पार्क्सचे नियोजन, विकास आणि संचालन करण्यात येणार आहे. दहा वर्षांच्या कराराअंतर्गत, एमएमआरडीए आणि पंचशील रियल्टी एकत्रितपणे बहुविभागीय विकास धोरण राबवणार आहेत. या माध्यमातून पुढील दशकात 25 अब्ज यूएस डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित होईल असा अंदाज असून, आयटी, आयटीईएस, बँकिंग, वित्तीय सेवा व विमा, बांधकाम तसेच पुरवठा साखळी व्यवस्थापन यांसह विविध क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती होईल.
खारबाव येथे औद्योगिक व व्यावसायिक केंद्र, वडाळा अधिसूचित क्षेत्र येथे फिनटेक, इन्श्युअरटेक, रेजटेक आणि सायबरसुरक्षा यांसाठी विशेष केंद्र, केएससी न्यू टाऊन येथे मुंबई आउटडोअर स्पोर्ट्स, गेमिंग आणि एआय इनोव्हेशन सिटी उभारणे यांसाठी के. रहेजा कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी करार करण्यात आला आहे. क्रीडा केंद्र उभारण्यासाठी आयआयएसएम ग्लोबल यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
सुमिटोमो रियल्टी अँड डेव्हलपमेंट यांच्या सहकार्याने मुंबईचे रस्ते आणि वाहतूक यांच्यात सुधारणा घडवली जाणार आहे. याशिवाय युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, जायका, सेम्बकॉर्प डेव्हलपमेंट लिमिटेड, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह यांच्याशीही करार करण्यात आले आहेत. या सर्व करारांमुळे 9.6 लाख रोजगारांची निर्मिती होण्याचा दावा केला जात आहे.