Devendra Fadnavis (Pudhari File Photo)
मुंबई

Minority Status Certificate Controversy: घाईगडबडीने शाळांना अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्यांवर कारवाई : फडणवीस

अल्पसंख्याक विकास विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची उचलबांगडी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर काही तासांतच घाईगडबडीने राज्यातील 75 शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचे प्रकरण अधिकाऱ्यांच्या अंगलट आले आहे. या शाळांना अल्पसंख्याकाचा दर्जा देणारे प्रमाणपत्र जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिला. त्यांच्या इशाऱ्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने तत्काळ अल्पसंख्याक विकास विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची उचलबांगडी केली आहे.

अल्पसंख्याक विकास विभागाचे तत्कालीन मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देणारे प्रमाणपत्र जारी करण्यावर स्थगिती दिली होती. कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर अल्पसंख्याक विभागाचा कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवला होता. त्यावेळी प्रमाणपत्र जारी करण्यावरील स्थगिती कायम होती.

बारामतीत 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून सरकारने त्यादिवशी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद ठेवली होती. तरीही 28 जानेवारीला अल्पसंख्याक विकास विभागाकडून आठ शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देणारी प्रमाणपत्रे जारी करण्यात आली. यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनीही याबाबत कडक भूमिका घेतली. या प्रकरणी ज्यांनी कोणी गडबड केली आहे, त्यांच्यावर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अल्पसंख्याक विकास विभागात कार्यासन 5 द्वारे अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्रे दिली जातात. कार्यासन 5 ची जबाबदारी विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्याकडे आहे. शैक्षणिक संस्थांकडून अल्पसंख्याक दर्जा देण्याबाबत प्रस्ताव आल्यानंतर त्याची पुढील कारवाई शेणॉय यांच्याकडून होते. याविषयी संस्थांची सुनावणी घेण्याचे आणि त्यावर निर्णय घेऊन अंतिमतः प्रमाणपत्र जारी करण्याचे अधिकार शेणॉय यांना आहेत. त्यामुळे याप्रकरणी शेणॉय आणि इतर अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. दरम्यान, अल्पसंख्याक दर्जा देणारी प्रमाणपत्रे जारी करून असंवेदनशीलता दाखवल्याने अल्पसंख्याक विकास विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची मंगळवारी विभागातून उचलबांगडी करण्यात आली. बदली करताना त्यांची नियुक्ती अन्य विभागात दाखवलेली नाही. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत शेणॉय यांना नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत राहावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT