मुंबई/दुबई : अमेरिका-इस्रायलने इराणविरुद्ध छेडलेल्या युद्धाच्या खाईत मध्यपूर्वेतील देश सापडले असून, हजारो भारतीय ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. रविवारी दिवसभरात आखाती देशांकडे होणारी चारशेपेक्षा जास्त विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. महाराष्ट्राच्या विविध शहरांतील अनेक जण आखाती देशात अडकले असून, त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दुबईची विमान वाहतूक बंद पडल्याने पुणे येथील इंदिरा स्कूल ऑफ बिझनस स्टडीज या शैक्षणिक संस्थेचे एमबीएचे 84 विद्यार्थी दुबईत अडकले आहेत. यामध्ये 42 मुले आणि 42 मुली आहेत. ठाणे जिल्ह्यातील 23 नागरिकही दुबई येथे अडकले आहेत. हे सर्व नागरिक 23 फेब्रुवारी रोजी पर्यटनासाठी दुबईला गेले होते. नियोजित वेळेनुसार रविवारी भारतात परतणार होते. त्यामध्ये 23 जणांपैकी 12 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.
अहिल्यानगरमधील 10 ते 12 प्रवासीदेखील दुबईत अडकले आहेत. इराणने आपली हवाई हद्द बंद केल्यामुळे दुबई आणि अबुधाबी विमानतळावर कोल्हापुरातील 100 हून अधिक नागरिक अडकून पडले आहेत. यामध्ये उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी आणि पर्यटकांचा समावेश आहे. याशिवाय चंद्रपूर, सोलापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील ठिकाणचे पर्यटक देखील आखाती देशात अडकले आहेत.
पश्चिम आशियातील अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचा मोठा फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पर्यटकांना बसला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबई, अबुधाबी आणि शारजाह येथील विमानसेवा विस्कळीत झाली असून सहलीसाठी गेलेले 350 हून अधिक पर्यटक आणि ‘उमरा’ यात्रेसाठी गेलेले भाविक अडकून पडले आहेत.
अ हेवन ट्रॅव्हल्सच्या 44 पर्यटकांचा आज परतीचा प्रवास सुरू होणार होता. पण विमानसेवा रद्द असल्याने दुबईतील हॉटेलमध्येच त्यांची सोय करण्यात आली आहे. सोमवारी (दि. 2) दुपारनंतर विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कदाचित परतीचा प्रवासाचा मार्ग मोकळा होईल, असे ‘अ हेवन’चे संचालक राजेंद्र बुगडे यांनी सांगितले.
सोफिया टुर्स अँड ट्रॅव्हल्स (जयसिंगपूर)चे इर्शाद शेख यांनी सांगितले की, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 40 उमरा यात्री काल मायदेशी परतणार होते. मात्र, विमान सेवा रद्द झाल्यामुळे त्यांना जेद्दाह येथील हॉटेलमध्ये थांबवण्यात आले आहे. दुसरीकडे उमरासाठी निघालेला 40 जणांचा दुसरा ग््रुाप विमानसेवा बंद झाल्यामुळे मुंबई विमानतळावरूनच माघारी परतला आहे. नजीकच्या काळात 150 लोकांचे टप्प्याटप्प्याने उमरा नियोजन होते, ते सध्याच्या तणावामुळे रद्द करण्यात आले आहे.
कोल्हापूरचे 100 ते 110 पर्यटक दुबईत सुरक्षित आहेत. शारजाहमार्गे जॉर्जियाला जाणारे विद्यार्थीही तिथेच थांबले आहेत. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून विमानाची तिकिटे व व्हिसाची मुदत वाढवून मिळाली आहे. टीव्हीवर दिसणारी परिस्थिती आणि प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती यात फरक असून पर्यटक सुरक्षित असून बहुतांश पर्यटकांचे स्थळदर्शन सुरू असून काहींनी तिथून व्हिडीओ काढून आपण सुरक्षित असल्याचे कळवले आहे.
इराणमध्ये अंदाजे तीन हजार भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यात दोन हजार विद्यार्थी एकट्या जम्मू-काश्मीरचे आहेत. त्यातही 1100 ते 1200 विद्यार्थी थेट युद्धक्षेत्रात अक्षरश: डांबले गेले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी मध्यस्थी करा, असे साकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातल्याचे जम्मू-काश्मीर विद्यार्थी असोसिएशनचे राष्ट्रीय समन्वयक नासीर खुहामी यांनी सांगितले.
दर पंधरा मिनिटांनी बॉम्बस्फोटांचे आवाज येतात, फोन बंद आहेत. इंटरनेटही बंद आहे. अशा परिस्थितीत एकेक क्षण काढणे कठीण चालले आहे. इराण सोडून बाहेर पडा, असे दुतावास सांगतो. मात्र बाहेर पडायचे कसे, असा हतबल सवाल आएशा नावाच्या विद्यार्थिनीने केला. तिचा व्हीडिओ एएनआय वृत्तसंस्थेने सामाजमाध्यमांवर पोस्ट केला आहे. भारताने तातडीने हस्तक्षेप करावा आणि विमान पाठवून आम्हाला एअरलिफ्ट करावे, असे साकडे तेहरानमध्येच अडकलेल्या आणखी एका भारतीय विद्यार्थिनीने पंतप्रधान मोदींना घातले.
दुबई, अबूधाबी, शारजा ही भारतीय पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. इथे फिरायला गेलेले सारेच भारतीय पर्यटक अडकून पडले आहेत. मध्य प्रदेशातून 700 जण असेच अडकले असून, त्यांना परतीच विमान तूर्त मिळणे कठीण आहे. कारण, आखातातील सर्वच विमानतळे बंद करण्यात आली आहेत. मध्य पूर्वेतील सर्व देशांनी आपल्या हवाई हद्दी विमानांसाठी बंद केल्याने भारतातून मध्य पूर्वेला ये-जा करणारी एकूण 350 विमाने रद्द करण्यात आली आहेत. तिकीट काढून बसलेल्या पर्यटकांची व्यवस्था विमान कंपन्या करत असून, जोपर्यंत हवाई हद्दी खुल्या होत नाहीत तोपर्यंत यापैकी कुणालाही परतीचे विमान मिळण्याची शक्यता नाही.
कोल्हापूर जिल्हा टूर ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुरज नाईक यांनी सांगितले की, कोल्हापूरचे 150 आणि सांगलीच्या एका कॉर्पोरेट कंपनीचे 200 जण सध्या दुबईत अडकले आहेत. येत्या दोन महिन्यांत सुमारे 2500 पर्यटकांचे परदेश दौरे नियोजित होते. ते आता धोक्यात आले आहेत. कोरोनानंतर सावरत असलेल्या पर्यटन व्यवसायासमोर पुन्हा एकदा युद्धाचे संकट उभे राहिले आहे. अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा आणि विमान कंपन्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.
युद्धप्रवण क्षेत्रामध्ये कोल्हापुरातील 132 नागरिक आहेत. ते सुरक्षित असले तरी त्यांचे कोल्हापुरातील कुटुंबीय, नातेवाईकांच्यामध्ये घालमेल सुरू आहे. चंदगड येथील एक युवक तेहरान येथे असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला आली आहे. तो शिपिंगवर काम करत आहे. सध्या तो प्रवासात असल्याने त्यांचा संपर्क झालेला नाही. याचबरोबर कोल्हापुरातील पाचगाव येथील तिघांचे कुटुंब कतारमध्ये आहेत. युद्धामुळे त्यांचे पाचगाव येथील कुटुंबीय चिंतेत आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी त्यांच्याकडून फोनवरून विचारपूस केली जात आहे.
रविवारी दुसऱ्या दिवशीही दुबई, अबूधाबी, देहा आणि मनामा आदी ठिकाणी इराणने क्षेपणास्त्रे डागली.दुबईत संरक्षण तळांवर शक्तीशाली स्फोटांचे आवाज दिवसभर येत राहिले.
एअर इंडियाने रविवारी युरोप, उत्तर अमेरिकेला जाणारी तब्बल 50 विमाने रद्द केली. इंडिगोनेही इस्तंबूल, ॲम्स्टरडॅम, लंडन, ॲथेन्स आणि मॅन्चेस्टरची उड्डाणे रद्द केली. याचा अर्थ प्रवाशांचे रखडणे हे आता आखाती देशांपुरते मर्यादित राहिलेले नाही.