Meteorological Department warns of rain in Mumbai, Thane, Palghar areas today
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
आज मुंबईसह ठाणे, पालघर या भागात हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. तर काही ठिकाणी गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच यावेळी ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील असे हवामान विभागाने सांगितले आहे.
त्याच बरोबर अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पुढील २ दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात काही ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून मराठवाड्यातही पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या वर्षी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी एप्रिल महिन्यात काही बरसल्या नाहित मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यभरात अवकाळी पावसाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीटही झाली आहे. यंदा मान्सूनचेही लवकरच आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने स्पष्ट केला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.