

Admission Rejected for Religion
नागपूर - एका मुलीला मुस्लिम आहे म्हणून प्रवेश नाकारल्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांच्याकडे तक्रारीनंतर दयानंद आर्य कन्या विद्यालय येथील शाळेचे सचिव, दोन शिक्षकांवर जरीपटका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
15 मे रोजी दयानंद आर्य कन्या विद्यालय जरीपटका, नागपूर या शाळेचे संस्था सचिव राजेश लालवाणी यांनी २०२५-२६ या सत्रात अल्पसंख्याक समाजातील विशेषतः मुस्लिम विद्यार्थीनींना प्रवेश देऊ नका अशा सूचना शिक्षकांना केल्या. काही शिक्षकांनी त्यांच्या दबावात येऊन मुस्लिम मुलींचे प्रवेश अर्ज घेऊन प्रवेश प्रलंबित ठेवले तर काही मुलींच्या पालकांना प्रवेश पूर्ण झाले असून जागा नसल्याचे तोंडी कळवून प्रवेश नाकारले. मात्र मुलीला प्रवेश नाकारलेल्या पालकांनी अल्पसंख्यांक आयोगाकडे धाव घेऊन न्याय मागितला.
सदर प्रकरण शिक्षण विभागात धर्माच्या आधारावर प्रवेश नाकारण्याचे व त्यामुळे संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाला नाकारणारे असल्याने आयोगाने महिला व बाल विकास विभाग तसेच शिक्षण विभाग यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्यास आदेशित केले. अधिकाऱ्यांनी चौकशी करून प्रकरणाची सत्यासत्यता लक्षात आल्यानंतर जरीपटका येथे राजेश लालवानी व शिक्षिका अनिता आर्य यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दबावाला बळी न पडणाऱ्या मुख्याध्यापिका गीता हरवानी यांनी या भेदभावपूर्ण व्यवहाराची तक्रार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष प्यारे जिया खान यांच्याकडे केलेली होती. आयोगाच्या अध्यक्षांनी सदर तक्रारीचे बाल संरक्षण विभाग व शिक्षण विभाग यांना चौकशीचे आदेश दिलेले होते अधिकाऱ्यांनी चौकशी केली. तक्रारीची सत्यता पडताळून पाहिली व सदर तक्रार खरी असल्याचे लक्षात येतात मुख्याध्यापिका गीता हरवानी यांना तात्काळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करावा असे आदेश दिले व सदर प्रकरणांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला . याबाबत पुढील तपास जरीपटका पोलीस स्टेशन करीत आहे.