Mahim Causeway Bandra Pudhari
मुंबई

Mahim Causeway Bandra: माहीम कॉजवे–वांद्रे जंक्शन कोंडीला दिलासा; 220 कोटींच्या उड्डाणपुलासाठी पालिकेची निविदा

माहीम मच्छीमार कॉलनी ते पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडणारा पूल; 24 महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : माहीम कॉजवे व वांद्रे जंक्शनवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी माहीम मच्छीमार कॉलनी ते पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी अखेर महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. यासाठी 220 कोटी 20 लाख 17 हजार रुपयांचे अंदाजपत्र तयार करण्यात आले आहे.

कोस्टल रोडमुळे दक्षिण मुंबईतून थेट पश्चिम द्रुतगती महामार्ग गाठता येणार आहे. मात्र, लोअर परेल, भायखळा लालबाग, वडाळा, शिवडी, परळ एल्फिन्स्टन, दादर आदी भागांतून येणाऱ्या वाहनचालकांना सेनापती बापट हा मार्ग सोयीचा पडतो. त्यामुळे अनेक वाहनचालक दादर रेल्वे स्टेशनलगतच्या केशवसुत पुलाचा वापर करतात. पुढे माहीम रेल्वे स्टेशन, माहीम चर्च व माहीम कॉजवे मच्छीमार नगरमार्गे पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जातात. त्यामुळे माहीम चर्चपासून वांद्रे सर्कलपर्यंतचा माहीम कॉजवे रोड हा रस्ता सतत वाहतूक कोंडीमध्ये अडकलेला असतो.

त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने सुमारे दोन वर्षांपूर्वी माहीम मच्छीमार कॉलनी ते पश्चिम द्रुतगती महामार्गदरम्यान उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र फाईल पुढे सरकली नव्हती. आता महापालिकेला उड्डाणपूल बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली असून पावसाळा वगळून 24 महिन्यांत हा उड्डाणपूल उभारण्याची कंत्राटदाराला मुदत देण्यात येणार असल्याचे पालिकेच्या पूल विभागाकडून सांगण्यात आले. हा उड्डाणपूल मिठी नदी व पश्चिम रेल्वे मार्गावरून बांधण्यात येणार आहे.

वेळेची बचत होणार!

माहीम चर्च ते वांद्रे कलानगरपर्यंत जाण्यासाठी अवघा दहा मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असल्यामुळे या प्रवासासाठी किमान 35 ते 40 मिनिटे लागतात. मात्र मच्छीमार कॉलनी ते पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत उड्डाणपूल झाल्यानंतर माहीम येथून अवघ्या पाच मिनिटांत कलानगरला पोहोचता येणार आहे.

कामाला मार्च अखेरीस सुरुवात

उड्डाणपुलाच्या कामाच्या निविदा प्रक्रिया येत्या महिन्याभरात पूर्ण करून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत कामाची सुरुवात होईल, असे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे 2029 पूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असा दावाही करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT