मुंबई : मेडिकल दुकानाचा परवाना रद्द करण्याची कारवाई टाळण्यासाठी थेट मंत्रालयातच लाच घेतल्याचे प्रकरण उघड झाल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग अडचणीत आला आहे. या प्रकरणी लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या राजेंद्र ढेरिंगे या लिपिकाविरोधात केवळ चौकशीच नव्हे, तर त्याची प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करण्याचे आदेश विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागातील लाच प्रकरणामुळे मंत्री झिरवाळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विभागाच्या लिपिकाने थेट मंत्री कार्यालयातच लाच घेतली. मंत्रालयातच झालेल्या या कारवाईने खळबळ उडाली. मंत्र्यांचा खासगी सचिव रामदास गाडे याच्या सांगण्यावरून लाच घेतल्याची कबुली लिपिकाने दिल्याने मंत्री झिरवाळ हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.
दरम्यान, मंत्री झिरवाळ यांनी प्रशासनात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देत मंत्र्यांनी विभागातील दक्षता पथकाला या प्रकरणाची सखोल आणि गोपनीय चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित लिपिक राजेंद्र ढेरिंगे याच्याविरुद्ध वस्तुनिष्ठ आणि सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.
राजेंद्र ढेरिंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी असून सध्या अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होता. त्याची प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करून त्याला मूळ विभागात परत पाठविण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी सहआयुक्त (दक्षता) आणि संबंधित पोलीस उपायुक्त यांना पाचारण करण्यात आले असून, लवकरात लवकर सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.