मुंबई : अजित पवारांच्या अकाली निधनाने राज्याच्या एका उमद्या आणि लोकप्रिय नेतृत्वाचा अस्त झाला आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील यांच्यासारख्या प्रभावी नेत्यांच्या अकाली एक्झिटचे दुःख राज्यातील जनता विसरली नसताना अजित पवारांच्या निधनाने पुन्हा एकदा हे दुःख राज्याच्या नशिबी आले आहे.
प्रमोद महाजन यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाच्या राजकारणात आपली पकड निर्माण केली होती. देशाचे संभाव्य पंतप्रधान म्हणून त्यांचे नाव चर्चेत असायचे. त्यांच्या रुपाने एक ना एक दिवस महाराष्ट्राचा सुपुत्र पंतप्रधान होईल ही आशा महाराष्ट्रातील जनतेला होती. मात्र, त्यांची राजकीय कारकीर्द भरात असताना कौटुंबिक वादातून त्यांच्या भावाने त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.
राज्याच्या राजकारणातून दिल्लीत गेलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही अशीच अकाली एक्झिट घेतली. ते केंद्रीय मंत्री झाल्याने महाराष्ट्राच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण, आजाराने त्यांना काळाने हिरावून नेले.
गोपीनाथ मुंडे हे देखील राज्याच्या राजकारणातून दिल्लीत सक्रिय झाले होते. अल्पावधीत त्यांनी दिल्लीत देखील पकड घेतली होती. त्यांना भाजपाने लोकसभेतील पक्षाचे उपनेते केले होते. लोकनेते असलेल्या गोपीनाथ मुंडे यांना भाजपची नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आल्यानंतर त्यांच्याकडे ग्रामविकास खाते देण्यात आले. ग्रामीण भागाची नाडी माहिती असलेल्या या रांगड्या नेत्याकडून राज्याला आस लागली असताना त्यांनाही अपघाती अकाली निधन आले. त्यांच्या निधनाचे दुःख महाराष्ट्रातील जनता अजूनही विसरलेली नाही.
आर. आर. पाटील हे देखील राज्याचे एक सर्वांना हवेहवेसे वाटणारे नेते. डान्सबार बंदी, गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव योजना असे कितीतरी घेतलेले लोकप्रिय निर्णय, उत्तम संसदपटू आणि निष्कलंक नेतृत्व म्हणून आर. आर. पाटील लोकप्रियतेच्या शिखरावर होते. अशावेळी कर्करोगाने त्यांना उमेदीच्या काळातच हिरावून नेले. या चार नेत्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली असताना आता अजित पवारांसारखे एक आश्वासक आणि धडाडीचे नेतृत्व हरपल्याने राज्याची नेतृत्वाची पोकळी वाढली आहे.