मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Pudhari File Photo
मुंबई

Maharashtra Farm Loan Waiver: 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी सर्व बँकांच्या पीक कर्जाला लागू; मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती

30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज माफ; नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पीक कर्ज देण्याचा अधिकार असलेल्या बँकांतून पीक कर्ज घेतलेल्या सर्वच शेतकऱ्यांना सरकारच्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यामुळे सरकारच्या कर्जमाफीचा लाभ कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, याविषयीची संभ्रमावस्था संपुष्टात आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा केली. तथापि, या कर्जमाफीचा लाभ कोणत्या बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जावर मिळेल, याबद्दल दावे-प्रतिदावे केले जात होते. आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः याविषयी स्पष्ट खुलासा केला आहे.

ते म्हणाले, मी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली असल्यामुळे त्याबाबत कुणाच्याही मनात संभ्रम नाही. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात. कुणी म्हणतो राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज माफ होणार नाही, कुणी म्हणतो जिल्हा बँकेचे होणार नाही, कुणी म्हणतो सोसायटीचे होणार नाही. खरे म्हणजे सरकारने पीक कर्ज देण्याचा अधिकार असणाऱ्या कोणत्याही बँकेने दिलेले 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वात चांगली कर्जमाफी

पीक कर्जमाफीच्या निर्णयाचा फायदा शेतकऱ्याला व्हावा, यासाठी काम सुरू आहे. आम्ही यापूर्वीच सांगितले आहे की, 30 जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत. त्यामुळे आता ही घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आल्यामुळे पुढच्या कार्यवाहीला सुरुवात होईल. विशेष समिती यावर काम करत आहे. ही समिती यासंबंधीच्या सगळ्या गोष्टी आणखी चांगल्या पद्धतीने स्पष्ट करेल. मी एवढेच सांगतो की, ही कर्जमाफी यापूर्वीच्या सर्वच कर्जमाफीच्या निर्णयांहून चांगली आहे.

युद्धावर भीतीचे वातावरण तयार न करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध माध्यमांना इराण विरुद्ध इस्रायल - अमेरिका युद्धावर नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होईल असे चित्र निर्माण न करण्याचे आवाहन केले. माझी माध्यमांना विनंती आहे की, नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण करू नये. जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, ती केंद्र सरकार योग्यप्रकारे हाताळत आहे. विनाकारण वेगवेगळ्या बातम्या दाखवून हे घडणार, ते घडणार, असे सांगून नागरिकांच्या मनात भीती व संभ्रम तयार करणे हे देशाच्या व समाजाच्या हिताचे नाही. केंद्र सरकारनेही हेच स्पष्टपणे सांगितले आहे, असे ते म्हणाले.

कोणते शेतकरी पात्र?

दोन लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असलेले शेतकरी

ज्यांचे पीक कर्ज थकले आहे असे शेतकरीच पात्र असतील

30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ होणार

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT