Maharashtra E-Challan Protest Pudhari
मुंबई

Maharashtra E-Challan Protest: ई-चलनविरोधात ५ मार्चला ‘चलो आझाद मैदान’; राज्यभर बेमुदत बंदचा इशारा

१ लाख वाहनांसह आंदोलनाची घोषणा; महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीचा सरकारला इशारा, लढा देशव्यापी होण्याची चिन्हे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : ई-चलनसह अन्य जाचक अटींविरोधात राज्यातील वाहतूकदारांनी आवाज उठवला असून 5 मार्चला 1 लाख वाहनांसह चलो आझाद मैदानची हाक दिली आहे. सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही, तर त्याच दिवसाच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत बंद केला जाईल, असा इशारा महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीने दिला आहे. या आंदोलनाला ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने पाठिंबा दिल्याने आता हा लढा देशव्यापी होण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीने गुरुवारी दुपारी एपीएमसीतील माथाडी भवन येथे राज्यभरातील विविध ट्रान्स्पोर्ट संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुंबई बस मालक संघटनेचे अध्यक्ष हर्ष कोटक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

40 हजारांच्या गाडीवर 80 हजारांचे ई-चलन लादले जात आहे. हे अन्यायकारक ओझे वाहतूकदार कसे सोसणार, सरकारने आम्हाला शेतकऱ्यांसारख्या आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे केले आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही 10 वेळा सरकारची भेट घेतली, पण पदरात फक्त आश्वासनेच पडली. आता चर्चा नाही, थेट कृती होईल, असे त्यांनी सांगितले.

5 तारखेला महाराष्ट्र थांबणार

जर 5 मार्चला प्रशासनाने गाड्या अडवल्या, तर जिथे गाड्या अडवल्या जातील, तिथेच गाड्या सोडून देऊन रस्ते जाम करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला. कायद्यानुसार 90 दिवसांत केसेस कोर्टात न पाठवल्यास त्या रद्द कराव्यात, ही तरतूद पाळली जात नाही. 8 महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या कमिटीचा अहवाल अद्याप का आला नाही? असा सवाल वाहतूकदारांनी उपस्थित केला आहे. सीमा तपासणी नाके बंद करण्याची घोषणा होऊनही तिथे वसुली सुरूच असल्याचा आरोप त्यांनी केला.

आजपासून प्रत्येक वाहनावर निषेधाचे पोस्टर आणि काळे झेंडे लावले जातील. प्रत्येक वाहतूकदार निषेधाची टोपी घालून आपला विरोध दर्शवेल. हे केवळ ट्रान्सपोर्टर्सचे आंदोलन नसून सर्वसामान्य वाहनचालकांचे आंदोलन आहे. ई-चलन आणि जाचक नियमांचा त्रास रिक्षा, टॅक्सी, बस आणि वैयक्तिक कार चालवणाऱ्या प्रत्येकाला होत आहे. त्यामुळे हे एक जनआंदोलन असून सर्व जनतेने यात सामील व्हावे.
प्रसन्न पटवर्धन, अध्यक्ष, बोकी संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT