

मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू होणाऱ्या आशियातील सर्वात जलद एम-टू-एम रो-रो जलवाहतूक सेवेला कोकणवासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. आज रविवाऱी 1 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता मुंबईतील भाऊचा धक्का येथे या सेवेचा शुभारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडणार आहे. यानंतर ही बोट विजयदुर्गकडे प्रस्थान करणार असून, या प्रवासासाठी प्रवाशांनी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात बुकिंग केले आहे. पहिल्याच दिवशी विविध श्रेणींमधून जवळपास सर्वच तिकीट बुकिंग होत आली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले आहे की, सुमारे 626 प्रवासी आणि मोठ्या संख्येने वाहने वाहून नेण्याची क्षमता असलेले हे अत्याधुनिक रो-रो जहाज मुंबई ते विजयदुर्ग हे अंतर अवघ्या 6 ते 7 तासांत पूर्ण करणार आहे. सुरक्षित, आरामदायी समुद्रप्रवासासोबतच पर्यटकांना कोकणचा निसर्गरम्य समुद्रकिनारा अनुभवण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे.
ही सेवा महाराष्ट्राच्या सागरी वाहतुकीच्या इतिहासातील एक नवीन आणि वैभवशाली अध्याय ठरणार असून, भविष्यात या सेवेमुळे रस्ते वाहतुकीवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होईल. कोकणाला वेगवान कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आणि राज्याच्या सागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा प्रकल्प एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.