

मुंबई : शहर व उपनगरात अचानक लागणाऱ्या भीषण आगीवर सुरुवातीलाच नियंत्रण मिळवण्यासह नागरिकांची सुटका कशी करायची, याबाबत चाळीसह सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना अग्निसुरक्षेतेचे प्रशिक्षण सक्तीचे करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिका सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला.
सदोष विद्युत वायर व यंत्रणेमुळे शॉर्टसर्किट होऊन भीषण आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दररोज कुठे ना कुठे आग लागत असून अनेकदा आगीमुळे जीवित व वित्तहानीही होत आहे. एखाद्या झोपडपट्टीसह इमारती व चाळीमध्ये आग लागल्यास तेथील पदाधिकाऱ्यांना अथवा नागरिकांना आगीवर सुरुवातीलाच नियंत्रण कसे आणावे याची माहिती नसल्यामुळे आग रौद्ररूप धारण करते. त्यामुळे अग्निशमन दलालाही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे पदाधिकारी व नागरिकांना अग्नी सुरक्षेचे धडे देण्यात यावे, अशी ठरावची सूचना भाजपाच्या नगरसेविका प्रीती सातम यांनी महापालिका सभागृहात मांडली होती.
मुंबईतील नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत व्यापक प्रमाणावर जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. मुंबई अग्निशमन दलाकडून अग्नि सुरक्षा सप्ताह, अग्नि सुरक्षा कार्यशाळा, मॉक ड्रिल या माध्यमातून आग लागण्याची मुख्य कारणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, इमारतीतील अग्नि सुरक्षा उपकरणांचा योग्य वापर, आग लागल्यास तात्काळ करावयाची प्राथमिक कृती, सुरक्षित स्थलांतर, आपत्कालीन संपर्क व्यवस्था,
अलार्म प्रणाली, प्रत्यक्ष प्रशिक्षण व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येत असली तरी, मुंबई शहरातील नागरिकांकडून अपेक्षित असा प्रतिसाद खूपच कमी प्रमाणात मिळतो. त्यामुळे गृहनिर्माण संस्था, इमारती, चाळीमधील पदाधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाकडून अग्निसुरक्षाबाबतचे प्रत्यक्ष प्रशिक्षण अनिवार्य करण्यात यावे, असे मत यावेळी सातम यांनी व्यक्त केले. याला सभागृहात एकमताने मंजुरी देण्यात आली.