Chatgpt use Pudhari
मुंबई

Maharashtra Board Exam: बोर्ड परीक्षांतील ‘मास कॉपी’ प्रकरणी 81 शिक्षक-कर्मचारी निलंबित; शिक्षण विभागाची कडक कारवाई

दहावी-बारावी परीक्षांमध्ये मोबाईल, तोतया विद्यार्थी आणि एआयचा गैरवापर; गडचिरोलीत चॅटजीपीटीद्वारे कॉपी उघड

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांदरम्यान उघड झालेल्या ‌‘मास कॉपी‌’ आणि इतर गैरप्रकारांवर शिक्षण विभागाने अखेर कठोर भूमिका घेतली आहे. विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सामूहिक कॉपी करण्यास मदत करणे, परीक्षा प्रक्रियेत हलगर्जीपणा आणि नियमभंग केल्याच्या आरोपांवरून राज्यातील 81 शिक्षक व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परीक्षा केंद्रावरील व्यवस्थापनातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

राज्यातील शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धुळीस मिळवणारे धक्कादायक प्रकार फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांदरम्यान उघडकीस आले आहेत. परीक्षा केंद्रांवर नियमांचे अक्षरशः धिंडवडे निघाल्याचे चित्र समोर आले असून मास कॉपी, मोबाईलचा वापर, तोतया विद्यार्थी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उत्तरे पुरवण्यापर्यंतचे प्रकार समोर आले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे या गैरप्रकारांत केवळ विद्यार्थीच नव्हे, तर काही ठिकाणी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि शिक्षकांनीही थेट किंवा अप्रत्यक्ष साथ दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या गंभीर प्रकारांमुळे शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेत आतापर्यंत 81 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असून अनेक प्रकरणांत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

तंत्रज्ञानाचा गैरवापर; चॅटजीपीटीद्वारे फसवणूक

कॉपीबहाद्दरांनी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही आधार घेतल्याचे गडचिरोलीत दिसून आले. जा. कु. ब्रोमनवार महाविद्यालयात बारावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या परीक्षेत चॅटजीपीटीच्या माध्यमातून प्रिंट आऊट काढून सामूहिक कॉपी करण्यात येत होती. याप्रकरणी 3 शिक्षक आणि एका शिपायावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT