एआय फॉर ॲग्री 2026 परिषदेचे उद्घाटन
एआय आधारित ॲप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचे लोकार्पण
मुंबई : शेतकऱ्याने डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध डिजिटल ॲपमुळे शेतकरी त्यांच्या भाषेत शेती विषयक प्रश्नांची उत्तरे त्वरित मिळवू शकतात. महा-एआय इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योगांना एकत्र आणून शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले.
‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025-29 ’ धोरणांतर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’च्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेती हे प्रत्येक घराशी व प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी निगडित असलेले क्षेत्र आहे. कृषी क्षेत्राला पुढे नेण्याचा संकल्प असून महाराष्ट्र राज्य एआय क्रांतीत आघाडीवर राहिल. सर्वसमावेशक एआय कृषी धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.
शेतकऱ्यांसाठी महा-विस्तार एआय हा डिजिटल साथीदार विकसित करण्यात आला आहे. याच्या सहाय्याने शेती विषयक सल्ला, हवामान व कीड व्यवस्थापनाविषयी माहिती, बाजार भावाचे संकेत आदींसह शासकीय योजनांपर्यंत सुलभ प्रवेशही मिळणार आहे. आतापर्यंत 30 लाख शेतकऱ्यांपर्यंत हे ॲप पोहचले असून नोंदणीमध्ये वाढ होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. प्रत्येक शेतकरी ॲप वापरत नाही आणि प्रत्येकाला मराठीतच माहिती हवी असेही नाही. म्हणूनच शासनाने बहुभाषिक आणि व्हॉइस-आधारित डिजिटल सुविधा सुरू केल्या आहेत. यासाठी स्थानिक भाषांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे शेतकरी डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर करत आहेत. पुढील काळात ही सेवा प्रत्येक तालुका आणि गावापर्यंत विस्तारण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
तर, महाराष्ट्राने जाहीर केलेली स्वतंत्र ‘ॲग्री एआय पॉलिसी’ स्वागतार्ह असून इतर राज्यांनीही त्याचे अनुकरण करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केले. कृषी क्षेत्रात एआयचा प्रभावी वापर सुरू असून पीक उत्पादनाचा अंदाज, योग्य पिकांची निवड, हवामान अंदाज, रोगांचे लवकर निदान आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे. देशातील विविध भागांतील शेतकऱ्यांसाठी 22 भारतीय भाषांमध्ये एआय आधारित तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आजचा काळ तंत्रज्ञानाचा असला तरी कृषी क्षेत्राच्या तंत्रज्ञानात शेतकरी हाच केंद्रबिंदू असला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, आयओटी यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाला शेतकऱ्यांच्या पारंपरिक ज्ञानाशी जोडल्यास महाराष्ट्राची शेती देशासह जगासाठी आदर्श ठरू शकते, असा विश्वास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्राने 2025-29 या कालावधीसाठी एआय आधारित कृषी धोरण राबवून देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यासाठी सुमारे 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
‘महाविस्तार’ ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत वैयक्तिक सल्ला, बाजारभाव, हवामान माहिती आणि विविध योजनांचे मार्गदर्शन केले जात आहे. आतापर्यंत 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड केले आहे. तर, एआय अँड ॲग्रीटेक इनोव्हशन सेंटर स्थापन करून प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांपर्यंत एआय आधारित सेवा पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. एआय तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिक सक्षम, सुरक्षित आणि समृद्ध होईल, असे कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले. यावेळी, कृषी क्षेत्रासाठी एआय आधारित महत्वपूर्ण ॲप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच विविध सामंजस्य करारांवर स्वार्क्ष़या करण्यात आल्या.