

मुंबई : इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेतील मराठी प्रथम भाषा प्रश्नपत्रिकेने यंदा वेगळ्याच चर्चेला तोंड फोडले आहे. व्याकरणाच्या विभागातील प्रश्न पाहून अनेक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. ही दहावीच्या बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे की, इयत्ता चौथीच्या घटक चाचणीची, असा उपरोधिक सवाल उपस्थित केला जात आहे.
शुक्रवारी सुरू झालेल्या परीक्षेतील मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील विभाग 4 मधील ‘भाषाभ्यास’ (पान क्रमांक 10) मधील प्रश्न अपेक्षेपेक्षा अत्यंत सोपे असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून उमटली. या विभागात (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती आणि त्यानंतर (आ) भाषिक घटकांवरील कृती असा क्रम होता. विशेष म्हणजे ‘शब्दसंपत्ती’ या उपघटकातील पहिलाच प्रश्नमधे खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा असा थेट,
सरळ आणि पाठ्यपुस्तकाधारित स्वरूपाचा होता. तीन गुण असलेल्या या प्रश्नात ‘घर’, ‘नदी’ यांसारखे समानार्थी शब्द, तर ‘रात्र’, ‘हजर’ यांसारखे विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आले. शब्दांचे वचन बदलताना ‘पुस्तक’ आणि ‘झाडे’ असे साधे शब्द देण्यात आले होते. यामुळे मराठी प्रथम भाषा घेऊन दहावीपर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेत एवढी साधी पातळी अपेक्षित असावी का, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रात उपस्थित होऊ लागला आहे.
शिक्षण तज्ज्ञ काय म्हणतात?
आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याच्या धोरणामुळे आधीच शैक्षणिक शिस्त ढासळत आहे. त्यात दहावीच्या परीक्षेतील व्याकरणाची पातळीही खालावली असेल, तर परीक्षेचा दर्जाच घसरल्याशिवाय राहणार नाही, असे मत राज्य मुख्याध्यापक महासंघाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी व्यक्त केली. तर मराठी अभ्यास केंद्राचे सदस्य सुशील शेजुळे यांनीही काठिण्यपातळीबाबत चिंता व्यक्त केली. पहिली ते आठवीपर्यंत पास होत आलेल्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा विचार करणे आवश्यक असले, तरी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विषयाची ठरावीक शैक्षणिक उंची राखणे तितकेच महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.