LPG Pulses Price Hike Pudhari
मुंबई

LPG Pulses Price Hike: आखाती तडाख्यामुळे गहू, डाळी महागल्या; अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची विधान परिषदेत माहिती

एलपीजी सिलिंडर 60 रुपयांनी महाग; युद्धाचा थेट परिणाम

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या तडाख्यामुळे केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात 60 रुपयांनी वाढ केली आहे, तर डाळी आणि गव्हाच्या दरात किलोमागे 2 ते 3 रुपये वाढ झाली आहे. विधान परिषद नियम 260 अन्वये चर्चेवर उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली.

भुजबळ म्हणाले, टंचाई रोखण्यासाठी रिफायनरीतील एलपीजी उत्पादन 9 हजार मेट्रिक टनांवरून 11 हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढविले आहे. शाळा-महाविद्यालये आणि रुग्णालयांना 100 टक्के गॅसपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांमध्ये घबराट पसरू नये म्हणून रेडिओ, एफएम, दूरदर्शन आणि मुद्रित माध्यमांद्वारे माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांविरोधातही जनजागृती केली जात आहे.

कृषिमालांचे कंटेनर अडकल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली होती. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, कंटेनरवरील डॅमेज शुल्क माफ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नाशिवंत मालाबाबत केंद्र शासनही विचार करत आहे.

काळाबाजाराच्या घटना घडू नयेत, यासाठी 8 मार्च रोजीच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दक्षता पथके स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीबाबत सध्या अशी कोणतीही वाढ झालेली नाही. भविष्यात वाढ होईल का, याबाबत निश्चित सांगता येत नाही.

सध्या 20 टक्के इथेनॉल मिश्रण लागू आहे. गॅसपुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यास कोळसा, रॉकेल यासारख्या पर्यायी इंधनांचा विचार केला जात आहे. रॉकेलपुरवठ्याची साखळी सुरळीत करून उपलब्ध केरोसिन डीलर्समार्फत पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे अडकलेली काही जहाजे सोडण्यात आली असून, ती मुंबई, कांडला आणि कोची येथे पोहोचली आहेत. भारत सरकार रशिया, इराण आदी देशांकडून इंधन पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. गल्फ देशांतील हल्ल्यांमुळे काही प्रमाणात पुरवठा खंडित झाला आहे, त्यामुळे जागतिकस्तरावर तात्पुरती कमतरता जाणवू शकते. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागू शकतो.

घरगुती गॅस, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना प्राधान्याने पुरवठा केला जात आहे. काही मोठ्या हॉटेल्सना पर्यायी इंधन वापरणे अवघड जात असले, तरी इतर रेस्टॉरंटस्‌‍नी कोळसा व केरोसिनचा वापर सुरू केला आहे. नागरिकांनी पेट्रोल, डिझेल, एलपीजी पुरवठ्याबाबत काळजी करू नये. जीवनावश्यक वस्तूंचा अतिरिक्त साठा, काळाबाजार व भाववाढ रोखणे, याबाबत राज्यसरकारतर्फे आवश्यक आणि योग्य ती कार्यवाही केली जात असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

दक्षता पथकांची कारवाई

जानेवारी ते 15 मार्च

तपासण्यांची संख्या : 2,129

जप्त माल/गॅस सिलिंडरची

संख्या : 1 हजार 208

जप्त मालाचे मूल्य :

3 कोटी 36 लाख 6 हजार 411

दाखल गुन्हे : 23

अटक व्यक्तींची संख्या : 18

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT